आंबवणे येथील चोराची पेटवून घेवून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:41 PM2019-01-18T16:41:20+5:302019-01-18T16:43:19+5:30
मंडणगड तालुक्यातील आंबवणे बुद्रुक येथे मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणातील संशयित तरूणाने बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली.
मंडणगड : तालुक्यातील आंबवणे बुद्रुक येथे मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या चोरीच्या प्रकरणातील संशयित तरूणाने बुधवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली.
यासंदर्भात मंडणगड पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, जयेश सुभाष रहाटवळ (आंबवणे बुद्रूक) हा गेल्या महिन्याभरापासून वंदना प्रल्हाद गव्हाळे यांच्या घरात रात्री शिरून खाण्याचे पदार्थ व वस्तूंची चोरी करत होता.
त्यामुळे अज्ञात चोराची माहिती मिळवण्यासाठी गव्हाळे यांनी आपल्या घराच्या माळ्यावर सीसीटिव्ही कॅमेरा बसवला होता. या कॅमेरामध्ये जयेश हा घरात रात्रीचा शिरून चोरी करताना दिसला होता. त्यामुळे गावात सुरू असलेल्या चोरीसंदर्भात जयेश याचे नाव पुढे आले होते.
जयेश याला पकडण्यासाठी ग्रामस्थ व पोलीसांनी अनेक शोधमोहीमा राबवल्या होत्या. मात्र त्यामध्ये तो सापडून आला नव्हता. बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान गव्हाळे यांच्या घरात खिडकीतून चोरी करण्याच्या उद्देशाने जयेश याने प्रवेश केला.
याची कुणकुण ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी त्याला पकडण्यासाठी घराला घेराव घातला. यावेळी आपण फसलो गेलो आहोत. आता आपण पकडले जाणार, असे समजताच त्याने घरात असलेले रॉकेल स्वत:च्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले.
पेटत्या अवस्थेत त्याने घराच्या माळ्यावरून अंगणातील मांडवावर उडी मारली. यावेळी मांडवावर गवत असल्याने गवतानेही पेट घेतला. त्यामुळे जयेश याला वाचवण्यात ग्रामस्थांना अपयश आले.
भाजून गंभीर जखमी झाल्याने जयेश याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत मंडणगड पोलीस स्थानकात भारतीय दंड विधान कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.