चिपळुणातूनही मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा, २ नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषण
By संदीप बांद्रे | Published: October 30, 2023 07:14 PM2023-10-30T19:14:04+5:302023-10-30T19:14:23+5:30
चिपळूण : मराठा आरक्षणावरून जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देत येथील सकल मराठा समाजाने २ ...
चिपळूण : मराठा आरक्षणावरून जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देत येथील सकल मराठा समाजाने २ नोव्हेंबरला येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवस लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्यभर मराठा समाजाने आंदोलन उभे केलेले असताना येथील मराठा समाजानेही सोमवारी तातडीची बैठक घेत आगामी भुमिकेबाबत निर्णय घेतले. या बैठकीत जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भुमिकेशी सहमत असल्याचे सांगत उपोषणाला पाठींबा जाहिर करण्यात आला. कुणबी प्रमाणपत्रे घेतले म्हणून कुणी कुणबी होत नाही. त्याबरोबर गरजवंताला गरज असेल, तर तो प्रमाणपत्र घ्यावे. यापुढेही तालूक्यातील मराठा समाजाने एकत्र यावे, तसेच समाजासाठी काम करताना राजकीय जोडे बाहेर ठेवून सर्वानी एकत्रितपणे काम करण्याचे ठरले. याचबरोबर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून गुरूवारी सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यत तालूका मराठा समाजायावतीने लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेऊन त्यामध्ये सर्वांनी सहभागी होऊन ताकद दाखवण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला सतीश कदम, सुबोध सावंतदेसाई, संतोष सावंतदेसाई, दिलीप देसाई, मकरंद जाधव, सतीश मोरे, सुरज कदम, जितेंद्र चव्हाण, रमेश शिंदे, सचिन नलावडे, शैलेश शिंदे, प्रभाकर मोरे, निर्मला जाधव, मालती पवार, अनुजा भोसले, रश्मी मोरे, ऐश्वर्या घोसाळकर, अंजली कदम, निलीमा जगताप आदी उपस्थित होत्या.