गुहागर : तालुक्यातील आरे येथील सुरेश सावंत यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सावंत यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सुरेश सावंत हे गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. २००० सालामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे त्यांनी पद सांभाळले हाेते. त्यानंतर २००९मध्ये त्यांनी राजीनामा दिला हाेता. विधानसभा निवडणुकीपूर्वी गुहागर तालुका भाजप अध्यक्षपद सांभाळले. २६ मे २०१९ला पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातून काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने सुरेश सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी सावंत यांच्याशी संपर्क साधत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी घेण्याची सूचना केली.
या निवडीबाबत सुरेश सावंत यांनी सांगितले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ठराविक लोकांनी त्यांच्या भविष्यात वैयक्तिक अडचणी निर्माण होतील म्हणून माझ्या नियुक्तीला आक्षेप घेतला. पक्षाची निष्ठा बाजूला ठेवून वाटेल ते बरळत होते. त्यांच्या बोलण्यालाही वरिष्ठांनी आक्षेप घेतला नाही. त्यांचीही त्याला संमती असेल, असे समजून बाजूला व्हायचा निर्णय घेत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आंबेडकर चळवळीमध्ये काम करायचं म्हणून आंबेडकर गटात पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुरेश सावंत यांनी सांगितले.