स्वामी माधवानंद यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:51 AM2021-05-05T04:51:50+5:302021-05-05T04:51:50+5:30
रत्नागिरी : पूजनीय स्वामी माधवानंद (६९) यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. आदिनाथांपासून संत ज्ञानेश्वर महाराज आणि रत्नागिरीतील ...
रत्नागिरी : पूजनीय स्वामी माधवानंद (६९) यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. आदिनाथांपासून संत ज्ञानेश्वर महाराज आणि रत्नागिरीतील पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या तीन उत्तराधिकाऱ्यांपैकी एक असलेले पुणे येथील स्वामी माधवनाथ यांच्या नाथसंप्रदायाच्या ध्यानयोगप्रधान शाखेचे स्वामी माधवानंद एक उत्तराधिकारी होते.
स्वामी माधवानंद यांचे आध्यात्मिक आणि मुख्यत्वे ध्यानयोग प्रचार-प्रसाराचे कार्य अनन्यसाधारण आहे. बाल, युवा आणि ज्येष्ठ साधकांमध्ये त्यांनी ध्यानयोग रुजवला, त्याची गोडी लावली आणि सत्मार्गावर मार्गक्रमण करण्याची दीक्षा दिली. भारतासह भारताबाहेर परदेशातही त्यांचा मोठा साधकवर्ग आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या श्रध्देखातर ते प्रतिवर्षी राज्यभरातील साधकांसह वर्षा सहल आयोजित करत आणि पावस येथे स्वामींच्या ठायी ध्यानसाधना करत असत. स्वामी माधवानंद यांच्या निधनामुळे त्यांच्या साधकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.