रत्नागिरी : महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जाती कल्याण समिती १० फेब्रुवारीपासून तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या कालावधीत अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा, या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचे नोकरीतील आरक्षण, अनुशेष आदींबाबत ही समिती आढावा घेणार आहे.आमदार डॉ. सूरज खाडे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत लखन मलीक, आमदार हरिष पिंगळे, सुधाकर भालेराव, सुधीर बारव, रमेश बुंदिले, सुभाष साबणे, वर्षा गायकवाड, सुजित मणचेकर, नरहरी झिरवाड, इम्तियाज सय्यद, अॅड. जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे, विजय उर्फ भाई गिरकर हे सदस्य आहेत. यावेळी समितीच्या उपसचिव मेघना तळेकर, अव्वर सचिव प्रकाशचंद्र खोदले, पक्षाधिकारी दामोदर गायकर आदी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. या तीन दिवसांच्या कालावधीत ही समिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, आश्रमशाळा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नगरपरिषद आदी ठिकाणी भेट देणार आहे.१० रोजी सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह््यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्यासमवेत ही समिती चर्चा करणार आहे. ११ वाजता जिल्हा परिषद सभागृहात कर्मचारी भरती, बढती, आरक्षण याबाबत चर्चा, दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे कर्मचाऱ्यांबरोबर योजनांचा आढावा घेण्यात येईल.११ रोजी जिल्हा परिषदेने मागासवर्गीयांसाठी केलेल्या कामाचा आढावा ही समिती घेणार आहे. तसेच पंचायत समितीलाही भेट देणार आहे. १२ रोजी लोकप्रतिनिधी, पालिका पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी पोलीस मुख्यालयात भरती, बढती, आरक्षण याबाबतचा आढावा समिती घेणार आहे. दौऱ्याची जोरदार तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या विविध योजनांबाबतही समिती माहिती घेणार आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जातीच्या योजनांचा आढावाअनुसूचित जाती कल्याणासाठीच्या योजना योग्यप्रकारे राबविण्यात आल्या आहेत का, याची पाहणी ही समिती करणार आहे. यामुळे संबंधित यंत्रणांची धावपळ उडाली असून, राबविलेल्या योजनांची माहिती संकलीत करण्यासाठी संबंधितांची धावपळ उडाली आहे.प्रवर्गातील आरक्षण, अनुशेष आदींबाबतही आढावा.आमदार डॉ. सूरज खाडे यांच्या अध्यक्षतेखालील समिती.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद,पोलीस अधीक्षक, नगर परिषद, आश्रमशाळा, मागासवर्गीय वसतीगृह आदी ठिकाणांना देणार भेटी.जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्याची तयारी.
माहिती संकलनासाठी यंत्रणेची धावपळ
By admin | Published: February 05, 2016 10:26 PM