उमेदवारीसाठी रणकंदन?
By admin | Published: August 15, 2016 12:28 AM2016-08-15T00:28:17+5:302016-08-15T00:28:17+5:30
नगराध्यक्ष निवडणूक : सेना, भाजप, राष्ट्रवादीतील दावेदारांना पक्षातूनच आव्हान?
रत्नागिरी : येत्या डिसेंबरमध्ये होत असलेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून सध्या सेना व भाजपमध्ये वादळ घोंगावू लागले आहे. उमेदवारीसाठी दावा करणाऱ्यांना त्यांच्याच पक्षातून जोरदार आव्हान दिले जात असल्याने उमेदवारी देण्यावरून रत्नागिरीत रणकंदन माजणार असल्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सेनेत तसेच भाजपमध्येही अनेक दावेदार आहेत. भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सेनेतर्फे बंड्या साळवी, तर राष्ट्रवादीतर्फे उमेश शेट्ये यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. असे असले तरी तीनही पक्षांमध्ये यावरून जोरदार धुसफूस सुरू असल्याने आयत्यावेळी तिसऱ्याच कोणाची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, दावेदार असलेल्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर २०१६मध्ये होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होणार काय, याबाबत संभ्रम कायम आहे. सोडत झाल्यास व महिला आरक्षण पडल्यास मात्र अनेकांची आणखीनच गोची होईल, अशी चर्चाही रंगली आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेतर्फे बंड्या साळवी, भय्या मलुष्टे, राहुल पंडित, राजेश सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु बंड्या साळवी हे सर्वाधिक आघाडीवरचे नाव आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा शब्दही वरिष्ठांनी दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या विरोधातही दुसरे इच्छुक मोर्चेबांधणी करीत आहेत. सेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवताना जुन्या - नव्यांमध्ये गटबाजी उफाळून येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भलत्याचाच लाभ होऊ शकतो, अशी चर्चा आहे.
युतीत नसलेल्या भाजपमध्येही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून वादळ निर्माण झाले आहे. विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे पुन्हा या पदाच्या उमेदवारीसाठी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. परंतु अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदासाठी अशोक मयेकर यांचे नाव निश्चित झालेले असतानाही महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट करून बंडखोरी केली. त्यावेळी झाकली मूठ सव्वा लाखाची राखण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांना सांभाळून घेतले. परंतु पक्षाच्या आदेशाला हरताळ फासल्याचा राग पक्षात महेंद्र मयेकर यांच्यावर आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी महेंद्र मयेकर यांना देण्यास पक्षातून विरोध असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार काय, असाही प्रश्न आहे. राष्ट्रवादीतून उमेश शेट्येंचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्या पक्षातही त्यांच्याबाबत नाराजी असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)