Uddhav Thackeray Live: “घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, तसा तुम्ही गुवाहाटीला जाऊन सांभाळू शकत नाही”: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 07:56 PM2023-03-05T19:56:31+5:302023-03-05T19:57:08+5:30

Uddhav Thackeray Live: कोरोनाच्या काळात देशाच्या पंतप्रधानांचे नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक झाले, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजप व केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली.

thackeray group chief uddhav thackeray slams bjp and eknath shinde group in khed ratnagiri shiv garjana sabha | Uddhav Thackeray Live: “घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, तसा तुम्ही गुवाहाटीला जाऊन सांभाळू शकत नाही”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Live: “घरात बसून महाराष्ट्र सांभाळला, तसा तुम्ही गुवाहाटीला जाऊन सांभाळू शकत नाही”: उद्धव ठाकरे

googlenewsNext

Uddhav Thackeray Live: हे लोक नेहमी आरोप करतात की, अडीच वर्ष घराच्या बाहेर पडले नाही. हो, घराबाहेर पडलो नाही. याचे कारण कोरोना होता. पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला, तो तुम्ही आज गुवाहाटीला जाऊनसुद्धा सांभाळू शकत नाही, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या शिवगर्जना सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. 

तुमचा अर्धावेळ नुसता फिरण्यात जात आहे. दिल्लीला सारखे मुजरे करायला जाणे, यात अर्धे आयुष्य चालले आहे. आणि काही जणांना अजून पूर्ण खोके मिळालेले नाही, त्यांना मंत्रीपदे देता येत नाहीत, त्यांना सांभाळताना तुमचे उरलेले आयुष्य जात आहे. मी जो महाराष्ट्र सांभाळला, तो मी म्हणजे एकटा नाही, माझ्यासमोर जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. जनतेची साथ नसती, तर अशा प्रकारे महाराष्ट्र सावरला गेला नसता, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. 

देशाच्या पंतप्रधानांचे नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे कौतुक झाले

जागतिक कीर्तीवरती आपल्या सगळ्यांचे कौतुक झाले. देशाच्या पंतप्रधानांचे कौतुक झाले नाही पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक झाले, म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचे कौतुक झाले, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. आपल्या काळात कधीही मृतदेहांची विटंबना झाली नव्हती, मात्र, योगींच्या काळात ती तिकडे झाली. मात्र, यावर कुणी बोलत नाही. आज सगळीकडे भ्रम निर्माण केला जात आहे, त्यापासून तुम्हाला सावध करण्यासाठी मी आलेलो आहे, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले. 

एसटी महामंडळाची अवस्था काय, ते आम्हाला माहिती

सगळे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर घालवायचे आणि तुटलेल्या फुटलेल्या एसटीच्या बसवर  ‘गतिमान महाराष्ट्र’ अशी जाहिरात लावायची. काचा फुटल्यात, कशीतरी ती एसटी लडखडत आहे. एसटी महामंडळाची अवस्था काय, ते आम्हाला माहिती आहे. मात्र, त्यावर गतिमान महाराष्ट्राच्या जाहिरातीवर हसणारा, गोंडस चेहरा लावायचा. म्हणजेच उद्योगांप्रमाणे एसटीलाही कर्नाटकात पाठवून देतो, अशी भावना असलेली दिसते. लाज, लज्जा, शरम काहीही नाही. एसटीत कोणत्याही सुविधा नाहीत, मात्र, स्वतःचा हसरा फोटो बाहेर लावताना लाज वाटत नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. 

दरम्यान, माझे कुटुंब, माझी जबाबदारी जाहिरातीवर टीका करण्यात आली. हो, अख्खा महाराष्ट्र माझे कुटुंब आहे आणि हे कुटुंब माझी जबाबदारी आहे. म्हणूनच संपूर्ण राज्यात आमच्या कुटुंबातील एक असा बहुमान जो कदाचित कुणाला मिळाला नसेल, तो मला मिळाला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी आहेच. जो स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकत नाही, तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार, जो कुटुंब बदलत बसतो, तो महाराष्ट्राची जबाबदारी काय घेणार, ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलत आहात, त्या गतीने होत असलेला गतिमान महाराष्ट्र कुणालाही परवडणारा नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: thackeray group chief uddhav thackeray slams bjp and eknath shinde group in khed ratnagiri shiv garjana sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.