"रामदास कदम यांच्या डोक्यावर परिणाम, त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 06:49 PM2023-03-05T18:49:48+5:302023-03-05T18:50:42+5:30
उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेड शहरातील एस. टी. मैदानात जाहीर सभा सुरु आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर ही उद्धव ठाकरेंची पहिलीच जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत ते कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाआधी भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. रामदास कमद भंपक आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्या मुलाचा पराभव केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे. तसेच भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे तीन वेळा रत्नागिरीत आले. परंतु, त्यांनी रत्नागिरीकरांसाठी काय केलं. मुख्यमंत्र्यांनी साडेआठशे कोटी रूपयांच्या कामांचं उद्घाटन केलं. परंतु, त्यालाआधी मंजुरी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दिली आहे, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा खासदार निधीचा पाच कोटी रूपयांचा फंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोठवल्याचा आरोपही भास्कर जाधव यांनी यावेळी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे आज ज्या ठिकाणी सभा घेताय, त्याच ठिकाणी १९ मार्च रोजी रामदास कदम यांची सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील अनेक आमदार आणि नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती रामदास कदम यांनी यावेळी दिली. तसेच आमच्या या सभेतून व्याज्यासह त्यांना उत्तर देण्यात येईल, असा इशारा रामदास कदम यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे खेडमध्ये येतायत म्हणून, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रचंड प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले आहे. यामध्ये खेडमधील २ टक्के देखील स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश नाही. रामदास कमदचा या लोकांनी किती दसका घेतलाय, हे यामधून दिसून येतंय. बाहेरची लोक आणून इथे राजकारण होत नाही, असा टोलाही रामदास कदम यांनी यावेळी केला.