खेड : ठाकरे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असलेले दापोली मंडणगड खेडचे माजी आमदार संजय कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी सुरू असतानाच, आता दापोलीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते संजय कदम यांना नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.संजय कदम यांनी २० जानेवारी रोजी खेड येथे पत्रकार परिषद घेऊन लवकरच आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात हजारो समर्थकांसह जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याचे घोषित केले होते. हा पक्षप्रवेश येत्या पाच मार्चला होत असल्याची चर्चा आहे.या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ३ फेब्रुवारी रोजी आपले सरकार या पोर्टलवर एका तक्रारदाराने माजी आमदार संजय कदम यांच्या आमदारकीच्या २०१४ ते २०१९ या कालावधीत दापोली शहरात खरेदी केलेली स्थावर मालमत्ता, स्टोन क्रशर आदी संपत्तीची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करावी, अशी मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने ही नोटीस काढली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
माजी आमदार संजय कदमांना लाचलुचपतची नोटीस, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 2:05 PM