रत्नागिरीत महायुतीचा बॅनर अन् शिंदेसेना गैरहजर
By मनोज मुळ्ये | Published: April 18, 2024 12:37 PM2024-04-18T12:37:04+5:302024-04-18T12:38:11+5:30
रत्नागिरी : महायुतीकडून अजून उमेदवार घोषित झालेला नसल्याने आणि भाजप आणि शिंदेसेना या दोघांनीही रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर ...
रत्नागिरी : महायुतीकडून अजून उमेदवार घोषित झालेला नसल्याने आणि भाजप आणि शिंदेसेना या दोघांनीही रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा केला असल्याने अजून तरी दोघांचा स्वतंत्र प्रचार सुरू आहे. महायुतीमधील भाजपने जागोजागी प्रचारसभा सुरू केल्या असून, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील शिंदेसेनेचा सहभाग अजूनही दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाजपने या जागेसाठी टोकाचा आग्रह धरला असून, येथील उमेदवार कमळ या निशाणीवर लढणाराच असेल, असे अनेक भाजप नेत्यांनी वारंवार सांगितले आहे. भाजपकडून सुरुवातीपासून अनेक नावांची चर्चा झाली आणि आताच्या घडीला नारायण राणे यांचे नाव पुढे आहे. हा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा असल्याने धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवण्यासाठी शिंदेसेना आग्रही आहे. शिंदेसेनेकडून सिंधुरत्न योजनेचे सदस्य, उद्योजक किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. दोन्ही पक्षांनी आपले दावे कायम ठेवले आहेत. आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत, तरीही या मतदारसंघात कोणता पक्ष लढणार आणि उमेदवार कोण असणार, याची घोषणा वरिष्ठ पातळीवरून करण्यात आलेली नाही.
घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केला आहे. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी ‘महायुतीचा मेळावा’ असेच बॅनर लावले जात आहेत. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील सभांमध्ये अजूनही शिंदेसेनेचा सहभाग दिसलेला नाही. महायुतीच्या व्यासपीठावर केवळ भाजपचेच नेते, पदाधिकारी दिसत आहेत. शिंदेसेनेचा प्रचारही स्वतंत्रपणेच सुरू आहे. त्यात भाजपचा सहभाग दिसत नाही.
उद्धवसेनेची नजर
आपला प्रचार करताना उद्धवसेनेची नजर महायुतीच्या उमेदवारीकडे लागली आहे. महायुतीने अजून येथे कोणता पक्ष आणि उमेदवार लढणार, याची घोषणा केली नसल्याने महाविकास आघाडीने त्यावर टीकाही केली आहे. कोणता उमेदवार जाहीर झाला तर गणित सोपे आणि कोण उमेदवार भारी पडेल, याची गणितेही बांधली जात आहेत.
प्रचार स्वतंत्र, पण उल्लेख महायुतीचा
भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्रपणे प्रचार करत असले तरी प्रचार स्वतंत्र पक्षाचा किंवा उमेदवाराचा न करता महायुतीचाच केला जात आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपापल्या उमेदवारीवर अजून ठाम आहेत. किरण सामंत यांच्या मुंबईतील गाठीभेटी अजून सुरू आहेत.