Ratnagiri: टँकरमधून गॅस चोरणाऱ्या फरार चालकाला ठोकल्या बेड्या, आणखी साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता
By अरुण आडिवरेकर | Published: March 19, 2024 04:14 PM2024-03-19T16:14:10+5:302024-03-19T16:14:32+5:30
रत्नागिरी : टँकरमधून ६ लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीच्या गॅसचोरीप्रकरणी फरार असलेल्या चालकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या ...
रत्नागिरी : टँकरमधून ६ लाख ६१ हजार ७१० रुपये किमतीच्या गॅसचोरीप्रकरणी फरार असलेल्या चालकाला अखेर संगमेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शमशाद निषाद खान (रा. उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव असून, त्याला रायगड येथे काल, सोमवारी (दि.१८) अटक केली. त्याच्याकडून आणखी काही साथीदारांची नावे उघड होण्याची शक्यता आहे.
याबाबत शुभांक विजेंद्रपाल सिंग (३८) यांनी फिर्याद दिली होती. गल्फ कंट्रीज कंपनीचा टँकर (एमपी ३७, जीए १७८५) जयगड येथे १७.७५ टन गॅस भरून १९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता खोपोली (जि. रायगड)कडे निघाला. हा टॅंकर २० राेजी खोपोली येथे पोहोचणे आवश्यक होते. परंतु, तो तेथे पोहोचला नाही. कंपनीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर सुरेंद्र दिवेदी यांनी शमशाद खान याला मोबाइलवर फाेन केला असता तो बंद होता. त्यांनी टँकरच्या जीपीएसची पाहणी केली असता ताे माभळे (ता. संगमेश्वर) येथे ११ तास थांबल्याचे दिसले.
त्यानंतर दिनांक २० रोजी दुपारी १:२७ वाजता चिपळूण येथे शेवटचे लोकेशन दिसले. मात्र, त्या लाेकेशनवर टॅंकर नव्हता. अन्य चालकांकडे चाैकशी केल्यावर टॅंकर पनवेलला गेल्याचे सांगण्यात आले.
सुरेंद्र दिवेदी यांनी २४ राेजी पनवेल येथे जाऊन हा टँकर ताब्यात घेतला. त्या टँकरचे वजन केले असता एकूण वजन २३.३६० टन भरले. टँकरचे गॅससह एकूण वजन ३४.८६ टन भरणे आवश्यक होते. परंतु, त्यामध्ये ११.५०० टन वजनाचा गॅस कमी हाेता. या टॅंकरमधील ११.५ टन गॅसची चाेरी झाल्याचे लक्षात आले.
पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, उपनिरीक्षक नागरगोजे यांनी पोलिस सचिन कामेरकर, सी. टी. कांबळे, विनय मनवल यांचे पथक तपासासाठी तयार केले. या पथकाने शमशाद खान याला रायगड येथील एका स्टील कंपनीतून अटक केली.