कृषी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थी आक्रमक, कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून रोखले; गेल्या ३८ दिवसापासून आंदोलन सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:50 PM2023-03-04T18:50:54+5:302023-03-04T18:51:32+5:30
दापाेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदलाविराेधात राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे. गेले ३८ दिवस हे ...
दापाेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बदलाविराेधात राज्यातील कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे. गेले ३८ दिवस हे आंदाेलन सुरू असून, या आंदाेलनाची अद्याप दखल न घेतल्याने शुक्रवारी (३ मार्च) दापाेली काेकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून राेखले. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण तणावपूर्ण झाले हाेते.
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी २५ जानेवारीपासून आंदाेलन सुरू केले आहे. या आंदाेलनाची शासनाने दखल न घेतल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. दापाेलीतील काेकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कार्यालयासमाेरही विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू आहे.
कार्यालयाबाहेर बेमुदत आंदाेलनासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून जाेरदार घाेषणाबाजी करत शासनाचा निषेध केला. विद्यार्थ्यांनी शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यापासून राेखले. प्रवेशद्वारावरच या कर्मचाऱ्यांना अडविण्यात आले.
कृषी अभियांत्रिकी पदवीधारकांवर कृषी सेवा मुख्य परीक्षा नवीन अभ्यासक्रमामुळे अन्याय होत असल्याने हे अन्यायकारक धोरण तत्काळ थांबवावे आणि या दोन्ही परीक्षांना तत्काळ स्थगिती द्यावी. राज्यामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी स्वतंत्र संचालनालय स्थापन करावे. मृद व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३पासून इतर शाखांच्या वैकल्पिक विषयांप्रमाणे कृषी अभियांत्रिकी शाखेचा वैकल्पिक विषय समाविष्ट करण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण हाेत नाहीत ताेपर्यंत आंदाेलन सुरूच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.