रत्नागिरीत मंचाबाहेरच रंगले नाट्य, रंगकर्मींमध्ये संताप
By Admin | Published: February 5, 2016 10:29 PM2016-02-05T22:29:49+5:302016-02-05T23:42:33+5:30
सादरीकरण फक्त परीक्षकांपुरतेच करण्याचा प्रयत्न? परीक्षकाच्या वक्तव्यामुळे तीव्र नाराजी
रत्नागिरी : शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाची ५५ वी संगीत राज्य नाट्य स्पर्धा शेवटाकडे झुकत चालली असतानाच एका परीक्षकांनी केलेल्या आडमुठ्या नि अनाकलनीय वक्तव्यामुळे तिला वेगळाच रंग चढला आहे. स्थानिक रंगकर्मी बाहेरून आलेल्या स्पर्धकांना वेगवेगळी मदत केल्याची उदाहरणे असतानाही एका परीक्षकाने स्थानिकांविरूद्धच मतप्रदर्शन केल्यामुळे रंगकर्मींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.संगीत राज्य नाट्य स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असतानाच एका परीक्षकांच्या वागण्यामुळे त्यांच्या स्पर्धाविषयक दृष्टिकोनावर संशयाचे बोट ठेवले जात आहे. या स्पर्धेत नुकत्याच झालेल्या बेगम सारंगा नाटकाच्या वेळी संबंधित कलाकार लेपल (कॉलर माईक) घ्यायला विसरली. अशावेळी प्रसंगावधान राखून स्टँड माईक घेतला जातो. मात्र ऐनवेळी गोंधळल्यामुळे त्या कलाकाराला तसे सुचले नाही. सदर परीक्षकांनी त्याचे खापर साऊंड सिस्टिमवर फोडले. प्रयोगादरम्यान पडदा उघडण्यात काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. मात्र परीक्षकांनी स्वत: त्यात हस्तक्षेप केला. या तांत्रिक बिघाडाचे खापरही त्यांनी स्थानिक संघांवर फोडले.या केंद्रावरील प्रेक्षकसंख्येने परीक्षकांवर दडपण येते, असे विधानही याच परीक्षकांनी केले आहे. वास्तविक ही स्पर्धा शासनमान्य असून, त्याला रसिकाश्रय लाभावा या एकमेव उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. संगीत राज्य नाट्यस्पर्धेला रत्नागिरीत गेली काही वर्षे अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकांची सिझन तिकीट ज्यावेळी सुरू झाली, तेव्हा दीड तासात दीड लाखाहून अधिक रकमेची सिझन तिकिटे विकली गेली. त्यामुळे नाटकांना येणारे प्रेक्षक हे कोण्या एका संघासाठी आलेले नसून, ते संगीत नाटकावरील प्रेमापोटी आलेले आहेत, असा मुद्दा एका रंगकर्मीने मांडला.
संगीत रंगभूमीला उर्जितावस्था प्राप्त व्हावी म्हणून शासन या स्पर्धा भरवून राज्यातील हौशी रंगकर्मीना पाठबळ देत असतानाच या परीक्षकांच्या वक्तव्यामुळे वातावरण गढुळ झाले आहे. (प्रतिनिधी)