... तर कोरोनाबाधितावर गुन्हा दाखल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:33 AM2021-04-20T04:33:32+5:302021-04-20T04:33:32+5:30
रत्नागिरी : गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी ...
रत्नागिरी : गृहअलगीकरणात असलेले कोरोनाबाधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यानी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
सध्या रत्नागिरी शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियमित वाढत असून नागरिकांना संशयित लक्षणे आढळून आल्यास तसेच पॉझिटिव्ह रुग्णाच्या सान्निध्यात आल्यास अथवा पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यांतून प्रवास करून आल्यास आरटीपीसीआर किंवा ॲन्टीजेन चाचणी करणे गरजेचे आहे.
लक्षणे नसलेल्या परंतु करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीस गृहअलगीकरण करण्यात येते. या अलगीकरणाचा कालावधी १७ दिवसांचा आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींनी गृहअलगीकरण केल्यानंतर १७ दिवस घराबाहेर पडू नये. जर संबंधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळून आली तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ज्या व्यक्तींना लक्षणे असतील व जे कोरोना रुग्णांच्या सहवासात असतील. परंतु, लक्षणे नसतील अशा व्यक्तींनी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. त्यांचा अहवाल येईपर्यंत त्यांनी घराबाहेर पडू नये, असेही डॉ. गावडे यांनी सांगितले.
सध्या रत्नागिरी शहरात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीची मोबाईल टीमद्वारे ॲन्टीजेन चाचणी करण्यात येत आहे. वारंवार एखादी व्यक्ती जर विनाकारण बाहेर फिरत असेल तर त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
कोरोना संशयित व्यक्तींकरिता किंवा चाचणी करावयाच्या असतील तर शिर्केहायस्कूल, माळनाका येथे आरोग्य पथक कार्यरत करण्यात आलेले असून तेथे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गावडे यांनी केले आहे.