टेंभ्ये : जिल्ह्यातील शालेय स्तरावरील परीक्षा घेण्याबाबत अद्याप शिक्षण विभागाने कोणताही आदेश दिला नसल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांनी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाकडे स्पष्ट केले असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात एस. सी. ई. आर. टी.चे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे मार्गदर्शन मागितले असून, त्यांच्याकडून सूचना प्राप्त होताच जिल्ह्यातील शाळांना कळविण्यात येणार असल्याचे वाघमोडे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीच्या परीक्षा घेण्याबाबत जिल्ह्यामध्ये शाळा व पालकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा माध्यमिक संघाने शिक्षणाधिकारी नीशादेवी वाघमोडे यांच्याशी संपर्क साधला होता. जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, शालेय स्तरावरील परीक्षा कशा घेण्यात याव्यात व परीक्षांचे स्वरूप कसे असावे, याअनुषंगाने शिक्षण विभागाने एस. सी. ई. आर. टी.चे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्याकडे मार्गदर्शन मागवले आहे.
राज्यस्तरावर इयत्ता पहिली ते नववी व अकरावी या परीक्षेचे स्वरूप कसे असावे व परीक्षांचे आयोजन कसे करण्यात यावे याअनुषंगाने विचार करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. या समितीच्या शिफारशीनंतरच राज्य शासनाकडून शाळास्तरावरील परीक्षांसंदर्भात सूचना देण्यात येणार आहेत.
..........................
जिल्ह्यातील कोणत्याही शाळेला शाळास्तरावरील परीक्षा घेण्याबाबत शिक्षण विभागाकडून अथवा राज्य शासनाकडून कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शाळेचे दैनंदिन कामकाज कोविड १९ ची नियमावली तंतोतंत पाळून पूर्ण करावे.
- नीशादेवी वाघमोडे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी