मंडणगडच्या विकासकामात कायम आग्रही भूमिका असणार : योगेश कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:32 AM2021-07-31T04:32:17+5:302021-07-31T04:32:17+5:30
मंडणगड : माजी मंत्री रामदास कदम यांच्या मागणीनुसार दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांच्या विकासासाठी पाच कोटींची मागणी नगरविकास ...
मंडणगड : माजी मंत्री रामदास कदम यांच्या मागणीनुसार दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांच्या विकासासाठी पाच कोटींची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केली आहे. दोन्ही तालुक्यांना प्रत्येकी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. याद्वारे शहरातील मूलभूत सुविधांचा विकास साधता येणार आहे. मंडणगडच्या विकासकामात कायम आग्रही भूमिका असणार, असे प्रतिपादन आमदार याेगेश कदम यांनी केले.
आमदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने मंडणगड नगरपंचायतीस विकासकामांकरिता अडीच कोटींचा निधी नगरविकास खात्याकडून नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मंजूर झाला आहे. या संदर्भात दि. २९ जुलै रोजी नगरपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार योगेश कदम यांनी माहिती दिली. यावेळी ते बाेलत हाेते.
ते पुढे म्हणाले की, मंडणगड शहरात विविध कारणांनी मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो आहे. मंजूर निधीच्या साहाय्याने रस्ते, गटार व्यवस्था यांसारखे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील. मागील सत्ताधाऱ्यांना पाणीसमस्या सोडविता आली नाही, शहरविकास आराखडा मांडता आला नाही. मंडणगड नगरपंचायतीच्या विकासाप्रती आमदार म्हणून आपली बांधीलकी आहे. मंडणगडच्या विकासकामांकरिता आपली कायम आग्रही भूमिका राहील, मंडणगड शहराच्या सर्व सोयीसुविधांच्या उपलब्धतेच्या, शहर संकल्पनेच्या आधारभूत परिपूर्ण शहर विकास आराखड्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे याेगेश कदम म्हणाले.
आपल्या मतदारसंघातील दापोली नगरपंचायतीस विकासकामांकरिता ११ कोटी इतका निधी मंजूर करून दिला आहे. पैकी दापोली येथे सुसज्ज उद्यानासाठी दोन कोटी ३० लाखांचा निधी मंजूर आहे. त्यामुळे आता महानगराप्रमाणे दापोली येथे सर्व सोयींनी युक्त उद्यान साकारण्यात येणार आहे. यावेळी बैठकीस उपस्थित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना विकासकामांच्या कागदपत्रांचे सोपस्कार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार योगेश कदम यांनी दिल्या. शहरातील सुचविलेल्या एकूण २१ विकासकामांचे प्रशासकीय ठराव घेऊन सर्वच शासकीय सोपस्कार पूर्ण करून लवकरच या विकासकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बैठकीत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद डौले, सभापती स्नेहल सकपाळ, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, विभागप्रमुख नीलेश गोवळे, माजी नगरसेवक आदेश मर्चंडे, प्रबोध कोकाटे, योगेश जाधव, प्रवीण जाधव उपस्थित होते.