लाेकमत न्यूज नेटवर्क
अनिल कासारे
लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. या वर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते, अशी माहिती महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी दिली.
महंमद रखांगी पुढे म्हणाले की, चार वर्षांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे चौपदरीकरण २०१८ ला पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज २०२१ चा मे महिना संपत आला तरीही महामार्गाच्या कामाला कोणतीही गती प्राप्त झालेली नाही. लांजा तालुक्यातील वाकेड ते आरवली हा जवळपास ८९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः रखडलेला आहे. अवघे १० टक्के थातूरमातूर काम झाले आहे. या टप्प्यात येणाऱ्या लांजा बाजारपेठेत मात्र चौपदरीकरणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.
नगरपंचायत नळपाणी योजनेच्या अंडरग्राउंड पाइपलाइनचे काम, महावितरणचे विद्युत पोल आणि विद्युत लाइनचे काम, साइडपट्टीचे कोणतेही नियोजन नाही. उड्डाणपुलाला लागून ॲप्रोच रोड तयार करण्याबाबत महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात उदासीनता दिसून येत आहे.
पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, ॲप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाउस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. हा सर्व्हिस रोड पक्क्या स्वरूपाचा म्हणजेच डांबरीकरणाचा होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ मलमपट्टी करून, खडी पसरवून कच्चा मातीचा हा रस्ता केला आहे. हा रस्ता जाग्यावर राहिलेला नाही. यामुळे बाजारपेठेत महामार्गावरील रस्ता शोधणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत.
लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता. परंतु भर बाजारपेठेतूनच महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्यानंतर या शहरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला. मात्र हा निर्णय सर्वार्थाने चुकीचा ठरत असून, बजेटच्या दृष्टीनेही हा ओव्हरब्रिज परवडणारा नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे रखांगी यांनी सांगितले.