लोकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे/चिपळूण : महापुरात अडकलेल्या पाळीव प्राण्यांना वाचविण्यासाठी जीव धोक्यात टाकणारे अवलियाही चिपळुणात आहेत. एकाने चक्क मांजराची दोन पिल्लं वाचविण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून पुरात उतरण्याचे धाडस केले, तर दुसऱ्याने श्वान व मांजरांना वाचविण्यासाठी थेट नदीपात्रातच उडी घेतली.
शहरातील भोगाळे येथील भोसले गॅरेजचे मालक सुधीर भोसले व पेठमाप येथील प्राणीमित्र व सर्पमित्र रुपेश ऊर्फ बापू पवार यांनी महापुरातून आपल्या पाळीव प्राण्यांना वाचविल्याने त्यांचे काैतुक हाेत आहे. सोशल मीडियावर सुधीर भोसले यांचा तिसऱ्या मजल्यावरून पुराच्या पाण्यात पडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र, त्यांचे नेमके काय झाले, असा प्रश्न चिपळूणकरांना पडला होता. ते या पुरातून सुखरूप बचावले असून, त्यांनी दोन मांजराच्या पिल्लांनाही वाचवले. तळमजल्यावर राहणारे भोसले पूर आल्याने एका खिडकीतून मांजराच्या दोन पिल्लांना घेऊन बाहेर आले. तेव्हा त्यांना तिसऱ्या मजल्यावरून तेथील रहिवाशांनी दोरीच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खांद्यावरील दोन पिल्लं सुखरूप वर पोहोचली, परंतु भोसले यांचा हात सटकला आणि पुन्हा ते तिसऱ्या मजल्याइतक्या उंचीवरून पुराच्या पाण्यात कोसळले. त्यानंतर टायरला दोरखंड बांधून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
वाशिष्ठी नदी काठावर रुपेश पवार यांचे फॉर्महाऊस आहे. त्यांच्याकडे डॉबरमन, लॅब्रेडोर व ब्रिगल जातीचे चार श्वान तर चार पर्शियन जातीची मांजरं आहेत. हे सर्व प्राणी एका खोलीत टेबलावर उंच ठिकाणी होते. तेथेही पुराचे पाणी पोहाेचल्याने त्यांना धोका निर्माण झाला होता. त्यावेळी पवार हे पेठमाप येथून कसेबसे एन्रॉन पूल येथे पोहोचले. पुलावरूनच त्यांनी पुराच्या पाण्यात उडी घेतली. नदीकाठी पुराच्या पाण्याचा प्रवाह अतिशय तीव्र होता. तरीही त्यांनी फार्म हाऊसच्या छप्परावर चढून या प्राण्यांची सुटका केली व छप्पराची कौलं काढून त्यांना आढ्यावर ठेवले व तेही रात्रभर तेथेच होते. अखेर दुसऱ्या दिवशीही शासकीय यंत्रणेची कोणतीही मदत न मिळाल्याने अखेर स्थानिक नागरिकांनी दोरखंडाच्या सहाय्याने त्यांना व त्यांच्या शेजारी अडकलेल्या गणेश पवार यांच्या कुटुंबीयांना सुखरूपपणे बाहेर काढले.
--------
पुराचे पाणी पटापट वाढत गेले. त्यामुळे मांजराच्या दोन पिल्लांना घेऊन बाहेर पडलो. त्यावेळी आपल्या इमारतीतील लोकांनी चांगली साथ दिली. जेव्हा हात निसटला तेव्हा डोळ्यावर काळोख आला होता. परंतु, या प्रसंगातून सुदैवाने मी वाचलो.
- सुधीर भोसले, चिपळूण.
------------------------
मुलगा रुपेश पवार रात्रभर पुरात अडकला होता. मदतीसाठी सतत संपर्क साधला पण उपयोग झाला नाही. पण आता नुकसानाची परवा नाही. मुलगा वाचला यातच धन्यता आहे. त्यादिवशी आम्ही एनडीआरएफची देवासारखे वाट पाहत होतो. परंतु, त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी येऊ, असे कळविले. अखेर आम्हीच २३ जुलैच्या सकाळी पुरात उतरून त्यांना दोरखंडच्या सहाय्याने बाहेर काढले.
- रतन पवार, माजी उपनगराध्यक्ष, चिपळूण.