गणपतीपुळे ,दि. ८: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे अंगारकी चतुर्थी निमित्ताने घाटमाथ्यावरून आलेल्या हजारो भाविकांनी मंगळवारी स्वयंभू श्रींचे गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर अंगारकीनिमित्ताने पार पडलेल्या यात्रोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटून भाविकांनी आपापल्या ठिकाणी मार्गक्रमण केले.
या अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे देवस्थान समितीतर्फे स्वयंभू गणेश मंदिर पहाटे ३.३० वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. रात्री १०.३० वाजेपर्यंत भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते.
या दिवशी पहाटे ३.३० वाजता स्थानिक पुजाऱ्यांच्या हस्ते श्रींची पारंपरिक पद्धतीने पूजाअर्चा करून भाविकांना रांगेत मंदिरात सोडण्यात आले. याकरिता गणपतीपुळे संस्थान श्री देव पंच कमिटीमार्फत भाविकांच्या सोयीसाठी सुसज्ज अशा मंडपासह दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली.
रत्नागिरी येथील अनिरुद्ध बापू ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी विशेष कामगिरी बजावली. त्यांच्या समवेत देवस्थानचे सुरक्षारक्षक व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्याशिवाय विशेषत: रत्नागिरी समुद्र चौपाटीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक, व्यावसायिक व पोलीस कर्मचारी आदींनी संपूर्ण रत्नागिरी समुद्र चौपाटीवर भाविकांना सूचना देण्याचे काम केले.
भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहनांची कोंडी होऊ नये, याकरिता वाहतूक शाखेचे पोलीस, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी लक्ष ठेवून होते. यात्रेदरम्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.