रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे येथे काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणातून एका तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन संशयितांना शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. एकनाथ मयेकर (५८), नितीन मयेकर (३१) आणि अमोल मयेकर (३२, सर्व रा. मिरजोळे भाटकरवाडी, रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
रमेश शंकर वाडकर (४०, रा. मिरजोळे भाटकरवाडी, रत्नागिरी) यांनी या मारहाणीबाबत शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वाडकर आपल्या बागेतून जात होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना, तू आमच्या जागेतील तुझे आंब्याचे पडलेले झाड आत्ताच्या आत्ता उचल, नाहीतर तुला ठार मारु, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या शर्टला धरुन रस्त्यावर फरफटत आणले. शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी तिघांना मंगळवारी अटक केली आहे.