गोहत्या प्रकरणातील तिघांना अटक, धामणदेवी येथील प्रकरण; आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 06:12 PM2019-02-04T18:12:12+5:302019-02-04T18:19:21+5:30
खेड तालुक्यातील धामणदेवी येथील गोहत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी घटनास्थळी तपासणी केल्यानंतर तेथे गोहत्येचा प्रयत्न झाला त्या आरोपींनी कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी/आवाशी : खेड तालुक्यातील धामणदेवी येथील गोहत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी घटनास्थळी तपासणी केल्यानंतर तेथे गोहत्येचा प्रयत्न झाला त्या आरोपींनी कबुली दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खेड पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील धामणदेवी या ठिकाणी मुंबई गोवा महामागार्चे जवळ जंगलमय भागामध्ये गोहत्या होत असल्याचे निदर्शनास येत असल्याने दि २५ जानेवारी रोजी तुषार शांताराम गोवळकर, अनिष आंब्रो, संकेत हुमणे, प्रशांत चाळके असे रात्रीच्या वेळी धामणदेवी जंगल परिसरामध्ये फिरत असताना त्यांना त्या ठिकाणी ५ जण स्कॉर्पिओ गाडीसह त्या ठिकाणी संशयास्पदरित्या दिसून आले. त्यावेळी त्यांना ग्रामस्थांची चाहूल लागताच रिव्हॉल्वर सारख्या हत्याराचा धाक दाखवून ते त्या ठिकाणावरून पळ काढला़.
ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला असता ते पळून जाण्यास यशस्वी ठरले होते़ त्या ठिकाणी ग्रामस्थांना एक बैल आणि गाय बांधून ठेवल्याचे दिसून आले़. या प्रकरणी तुषार शांताराम गोवळकर (२८, पिरलोट दिक्षीतवाडी, खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (सुधारणा कायदा) २०१५ चे कलम ५(अ)(ब), ८ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३/२५ प्रमाणे दिनांक २६ जानेवारी रोजी दाखल करण्यात आलेला होता़.
या प्रकरणातील आरोपी शमशुद्दीन इस्माईल खेरटकर ( 33, खेर्डी मोहल्ला चिपळूण), पांडुरंग जयराम कदम (५०, आवाशी देऊळवाडी, खेड), संतोष लक्ष्मण गमरे (४८, आवाशी बौध्दवाडी खेड) असे संशयित आरोपी निष्पन्न त्यांना अटक केली आहे़ यातील शमशुद्दीन हा गावोगावी फिरुन गुरे जमा करतो व ती गुरे पांडुरंग कदम व संतोष गमरे यांचे मदतीने पांडुरंग कदम यांचे गोठयात एकत्र ठेवत असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे मुंढे यांनी सांगितले़.
मिळून आलेल्या एका बैलाची ओळख पटलेली असून तो बैल सौ.वनिता शाहू आंब्रे (शेल्डी खालचीवाडी, खेड) यांचे मालकीचा असून शमशुद्दीन याने वनिता आंबे्र यांचेकडून विकत घेतलेला असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास सुरु असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिक्षक मुंढे यांनी स्पष्ट केले़.
पोलीस गेले १० दिवस अगोदरपासून नागरिकांच्या घेऊन पेट्रोलिंग करीत असल्याचे सांगून पोलीस अधिक्षक मुंढे यांनी गोहत्येचा प्रयत्न झाला हे सत्य आहे़ कारण घटनास्थळी जनावरांच्या पोटातून काढण्यात आलेले प्लॅस्टिकच्या पिशव्या, सुकलेले रक्त तसेच आतडी अशा वस्तू दिसून आल्याचे त्यांनी सांगितले़. अशी प्रकरणे नागरिकांच्या लक्षात आल्यास त्यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा़, असे आवाहन पोलीस अधिक्षक मुंढे यांनी केले आहे़ तसेच कोणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले़
या प्रकरणातील आरोपी शमसुद्दीन खेरटकर याच्यावर जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत़ त्यामध्ये दोन आलोरे पोलीस स्थानकात आणि एक सातारा जिल्ह्यातील कोयनानगर पोलीस स्थानकातील गुन्ह्यांचा समावेश आहे़ आता चौथा गुन्हा खेड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे़