काताळेत नऊ वर्षांनंतर शिमग्याचे तीन होम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:49 AM2021-04-05T11:49:34+5:302021-04-05T11:51:05+5:30
Holi Ratnagiri-गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी होणारे होम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर शिमगोत्सवातील तीनही होम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.
आबलोली : गुहागर तालुक्यातील काताळे गावातील अंतर्गत वादामुळे एकाच ठिकाणी होणारे होम यावर्षी मात्र पूर्वांपार जागी लावण्यात आले. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे तब्बल ९ वर्षांनंतर शिमगोत्सवातील तीनही होम पूर्वांपार लागल्याने ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.
काताळे येथील ग्रामदेवता श्री भैरी, कालकी, चंडिका देवीचे पारंपरिक तीन शिमगे वेगवेगळ्या जागृत ठिकाणी म्हणजेच कदमवाडी सहाणेवर पहिला होम, कोंडचा भैरी देव मंदिर येथे दुसरा होम, तर सोमनाथ मंदिर येथे तिसरा होम, अशा प्रकारे होत असत; परंतु सन २०१३ साली झालेल्या गावातील काही अंतर्गत वादामुळे गुहागर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गावातील मानकरी यांनी पूर्ण शिमगोत्सव बंद होण्यापेक्षा या वादावर तोडगा म्हणून तिन्ही शिमगे एकाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार नऊ वर्षे कोणतेही वादविवाद न होता कमी लोकसंख्या असूनही उत्सव आनंदाने होत आहे.
पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे होम सुरू केले तर आणखी लोक या उत्सवात आनंदाने सहभागी होतील या अपेक्षेने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने हे होम यावर्षीपासून पूर्वीप्रमाणे त्या त्या ठिकाणी करण्याचे ठरले.
पहिला होम ग्रामदैवत मंदिर येथील जवळच सहाणेवर लागल्यानंतर दुसऱ्या होमचे म्हणजेच कोंडचा भैरी देव मंदिर हे ठिकाण दूर असल्याने या ठिकाणी पालखी वाहनाने घेऊन जाण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला व तिसरा होम सोमनाथ मंदिर येथे लागल्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी हळदी-कुंकू समारंभासाठी अरुण कदम यांच्याकडे जाऊन येईल व नंतर सहाणेवर एकाच ठिकाणी गावातील प्रत्येक वाडीच्या पूजा, आरत्या प्रत्येक वाडीनुसार त्या त्या दिवशी होतील, नंतर सत्यनारायणाची महापूजा होईल. दुसऱ्या दिवशी पालखी देवळात जाईल, असे ठरविण्यात आले.
हा उत्सव नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यास अरुण कदम, जयवंत कदम, दिलीप काताळकर, नामदेव बारस्कर, पोलीस पाटील सचिन रसाळ तसेच देवस्थानचे सुधाकर बारस्कर, भिकू बारस्कर, सूर्यकांत काताळकर, मंगेश बारस्कर, महादेव बारस्कर, रवींद्र कुळये, दीपक बारस्कर, मधुकर अजगोलकर, दत्ताराम कुळये, सुरेश रसाळ, रमेश खारवटकर, प्रकाश सावंत यांसह ग्रामस्थ सहभागी होते.