कुंडीत घर आगीत जळून पावणेतीन लाखांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:16 PM2020-02-06T13:16:28+5:302020-02-06T13:16:56+5:30
शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
देवरुख : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत कुंडी येथील बंद घर जळाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये प्रकाश कृष्णा सावंत यांचे सुमारे २ लाख ७५ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कुंडीतील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि मदतीमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी - पाटीलवाडी येथील प्रकाश सावंत हे नोकरी निमित्ताने मुंबई येथे असतात. त्यांचे मूळ घर गावात आहे. सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सावंत यांच्या घराच्या तीन खोल्या पूर्ण जळाल्या आहेत.
आगीचे लोळदेखील दिसू लागल्यानंतर बौध्दवाडीतील विलास कांबळे व अनंत कांबळे यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिली. असंख्य लोक लगेचच घटनास्थळाकडे जमले आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.
देवरूख पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पंचनामा तलाठी बालाजी साळी, सरपंच आकांक्षा सावंत, उपसरपंच दिलीप लोकम, ग्रामसेविका प्रभावती भोसले, पोलीसपाटील धीरेंद्र मांजरेकर यांनी केला. माजी सरपंच संगीता सावंत, शिवराम देसाई यांनी मोठी मदत केली.
रात्रीचा पाणीपुरवठा
रात्री उशिरा ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा सुरु केला म्हणूनच पाण्याचा मारा करुन ग्रामस्थांना आग आटोक्यात आणता आली. अन्यथा संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असते. रात्री २.३० वाजेपर्यंत हे शर्थीचे प्रयत्न चालू होते.