दुकाने उघडी ठेवल्याने तीन व्यापाऱ्यांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:34 AM2021-04-23T04:34:29+5:302021-04-23T04:34:29+5:30
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असतानाही गुरुवारी येथील बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने ...
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केलेले असतानाही गुरुवारी येथील बाजारपेठेत काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या पथकाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये बाजारपेठेतील नाथ पै चौकातील ३ बड्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी १ हजाराचा दंड करीत दुकान बंद करण्यास भाग पाडले. तसेच घरपोच सेवा देण्याविषयी समज दिली.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी बुधवारी जाहीर केलेल्या नवीन आदेशानुसार ५ हजारपेक्षा अधिक लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार चिपळूण शहर, खेर्डी व सावर्डे येथील व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवून घरपोच सेवा देण्याची सूचना केली होती. तरीही गुरुवारी काही व्यापाऱ्यांनी दुकाने सकाळच्या सत्रात सुरू ठेवली होती. बाजारपेठेतील नाथ पै चौक येथील किराणा माल, कापड व बेकरीचे दुकान उघडे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर दिवसभर नगरपरिषदेच्या पथकामार्फत शहरात सर्वत्र लक्ष ठेवण्यात आले होते. दरम्यान, शहरातील बहादूरशेखनाका, वांगडे मोहल्ला, प्रांत कार्यालय, चिंचनाका, शासकीय विश्रामगृह येथे मोबाईल व्हॅनद्वारे काही नागरिकांची अॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ जण कोरोनाबाधित आढळले. तसेच पवन तलाव येथील तपासणी केंद्रावर २२ जणांची आरटीपीसीआर व २१ जणांची अॅन्टिजेन तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ जण कोरोनाबाधित आढळले.
........................................
कोरोनाबाधित रुग्णांचे होताहेत हाल
सध्या तालुक्यात १३०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्या पोहोचली असून, त्याचा ताण येथील आरोग्य यंत्रणेवर येऊ लागला आहे. कामथे उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुलये हाऊस फुल्ल झाली आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुना वेळीच उपचार मिळणे कठीण बनले आहे. काही रुग्णांना बेड मिळवण्यासाठी प्रत्येक रूग्णालयात फिरावे लागत आहे. त्यासाठी नेेते, पुढाऱ्यांना विनवणी करण्याची वेळ काही रुग्णांवर येऊ लागली आहे.