रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे नातुंडेवाडी येथे चिरे वाहतूक करणारा टेम्पो ट्रक उलटून भीषण अपघात झाला. त्यामध्ये ट्रकमधील चिरे अंगावर पडल्याने ३ कामगारांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
ट्रक मालकासह चौघेजण गंभीर जखमी झाले असून दोघांना पावस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तर दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाला अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अपघातातील मृतांमध्ये अजय अनंत लाखण, सुधाकर कृष्णा लाखण, गोरख मोहन काळे (सर्व राहणार शिवार आंबेरे, रत्नागिरी) या तिघांचा समावेश आहे. सूर्यकांत गोविंद पाजवे, ओमकार विश्वनाथ खानविलकर, यशवंत गोसावी, दिलीप नमसळे हे चारजण जखमी झाले. मावळंगे नातुंडेवाडी येथून विश्वनाथ खानविलकर यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये चिरे भरुन तो ट्रक मोरया सडा येथे निघाला होता.
ट्रक नातुंडेवाडी येथील अवघड वळणावर आला असता ट्रकला आंब्याच्या झाडाची फांदी अडकली. त्यामुळे ट्रक रस्ता सोडून बाहेर गेला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक एकाबाजूला उलटून अपघातग्रस्त झाला.अपघातग्रस्त ट्रकमधून सातजण प्रवास करीत होते. काही कामगार ट्रकच्या हौद्यामध्ये बसले होते. ट्रक पलटी झाल्याने ट्रकच्या हौद्यात चिऱ्यावर बसलेल्या अजय अनंत लाखण, सुधाकर कृष्णा लाखण व गोरख मोहन काळे यांच्या अंगावर चिरे कोसळले. चिऱ्याखाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला.उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या गाड्यांचा वापर केला. शिवारआंबेरे गावातील ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पूर्णगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.