चिपळूण व्यापारी महासंघातर्फे नायब तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याकडे निवेदन देण्यात आले. वासुदेव भांबुरे, बापू काणे, सिद्धेश लाड, उदय ओतरी, किशोर रेडीज आदी उपस्थित होते.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनविषयी येथील व्यापाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. एक वर्षांहून अधिक काळासाठी व्यापार विस्कळीत झाला आहे. ही परिस्थिती पाहता पुन्हा दुकाने बंद केल्यामुळे व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील व्यापाऱ्यांची लॉकडाऊन स्वीकारण्याची अजिबात मानसिकता नाही, अशा आशयाचे निवेदन तालुका व्यापारी महासंघाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर केले.
चिपळूण तालुका व्यापारी महासंघाने या निवेदनाची प्रत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना सादर केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनअंतर्गत सरकारने दुकाने बंद करण्याचा घेतलेला निर्णय हा व्यापारी वर्गावर अन्यायकारक आहे. नव्या नियमांनुसार कामगारांना लस किंवा ‘आरटीपीसीआर चाचणी’ सक्तीची केली आहे. ही चाचणी दर १५ दिवसांनी करणे बंधनकारक केले आहे. व्यावसायिकांना ही चाचणी आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. शासनाने व्यापाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची व्यवस्था करून द्यावी. या लसीकरणाची व स्वॅब टेस्टिंगची व्यवस्था मोफत व तीनपट करावी. त्याची वेळ वाढविण्यात यावी. नव्या नियमांनुसार खासगी किंवा सरकारी व सार्वजनिक वाहतुक सुरळीत सुरू आहे. कारखाने सुरू आहेत. फक्त मोजक्याच लहान मोठ्या व्यापाऱ्यांवर व्यापारबंदीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. हे सर्व व्यापारी काेरोनासंदर्भातील सर्व नियम पाळत आहेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष वासुदेव भांबुरे, बापू काणे, सिद्धेश लाड, विश्वास चितळे, राजेंद्र वेस्वीकर, बिलाल पालकर, कांता चिपळूणकर, किशोर रेडीज, उदय ओतरी, विजय गांधी, शैलेश वरवाटकर, विजय चितळे, योगेश कुष्टे, श्रीकृष्ण खेडेकर, दिलीप जैन यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.