चौदरीकरणाच्या कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:52 PM2020-11-30T17:52:15+5:302020-11-30T17:53:54+5:30
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड शहरातील भरणेनाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम आणि जगबुडी ...
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील खेड शहरातील भरणेनाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाचे सुरू असलेले काम आणि जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सलग सुट्टी असल्याने अनेकजण कोकणात दाखल होत असून, रविवारी या मार्गावर वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.
खेड तालुक्याच्या हद्दीत कशेडी ते पशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम कल्याण टोलवेज इंफ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीकडून सुरु आहे. ४४ किलोमीटरच्या टप्प्यात जवळपास ८० टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, भरणे नाका येथील कामाला सुरुवातीपासून ग्रहण लागले आहे. गतवर्षी भरणे नाका येथे भुयारी मार्गासाठी खड्डा खोदून ठेवण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी हा खड्डा भरून टाकण्यात आला आणि तेथे उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले.
गेले काही महिने या ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे भरणे नाका परिसरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. तसेच जगबुडी पुलाला जोडणारा जोडरस्ता खड्ड्यात गेल्याने जगबुडी पुलावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे.
वाहनांची वर्दळ
तीन दिवस सलग सुट्टी आल्याने अनेकजण कोकणात येत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. रविवारी या मार्गावर वाहनांची संख्या अधिक होती. वाहनांची कोंडी झाल्याने प्रवाशांना तासनतास एकाच ठिकाणी उभे राहावे लागले होते. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.