कोरोना संक्रमण कमी होण्यासाठी प्रशासनाला ‘हेल्पिंग हॅण्ड’चे सदस्य सुरुवातीपासून सक्रिय आहेत. गतवर्षीपासून ‘हेल्पिंग हॅण्ड’मध्ये काम करणारी मंडळी असो वा सामाजिक संस्था आजही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. कोरोना संक्रमणाचा धोका वाढला असतानाच उपचारादरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अंत्यसंस्कारासाठी नगर परिषद कर्मचारी, सामाजिक संस्था कार्यरत आहेत. रक्ताच्या नात्यांपेक्षा अनोळखी व्यक्ती मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करीत असल्याने खरे ‘कोविड योध्दे’ ठरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागातील यंत्रणेची धडपड सुरू आहे. मात्र उपचारादरम्यान काही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी पडल्याने काहींचा मृत्यू होत आहे. वास्तविक कोरोना रुग्णाचे निधन कुटुंबीयांसाठी धक्का असतो. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निकटवर्तीय असूनही घाबरतात. अशावेळी त्या पार्थिवाचे हाल होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी मृतदेह पॅक करून नगरपरिषद किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर काही तासातच अंत्यसंस्कार आटोपले जातात. जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे समजताच हे ‘कोविड योद्धे’ सज्ज होतात. अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकांमार्फत अंत्यविधी केले जातात. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी निघण्यापूर्वी कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई किट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. संबंधित धर्मीयांच्या पद्धतीनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन करण्याचा विधी पार पाडला जातो. त्यानंतर पीपीई किट तेथेच जाळले जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘कोविड योध्दे’ घरी गेल्यानंतर निर्जंतुकीकरणाबरोबर स्वच्छतेची काळजी घेतात. वास्तविक कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हेल्पिंग हॅण्ड असो वा अंत्यसंस्कार करणारी टीम असो, या प्रत्येक ‘कोविड योद्ध्या’चे काम निश्चित आदर्शवत ठरेल. दीड वर्ष झाले तरी कोरोना योद्धे लढतच आहेत. वास्तविक त्यांचे कार्य, जिद्द, संयम याचे तरी भान सर्वसामान्य माणसांनी राखले तर नक्कीच जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
- मेहरून नाकाडे