खेड : वृक्षांचे रक्षण करून नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीला चालना मिळावी व पर्यावरण संतुलन राहावे, यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे. वृक्षारोपण हा एक राष्ट्रीय कार्यक्रम असून, या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी, असे आवाहन आमदार योगेश कदम यांनी केले.
राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस येथील युवा सेना, शिवसेना व महिला आघाडीतर्फे सेवाभावी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी आमदार कदम यांनी मार्गदर्शन केले. आमदार योगेश कदम यांच्या हस्ते कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात व कळंबणी बुद्रुक राष्ट्रीय महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले.
तसेच सुकिवली-कर्टेल येथे रस्त्याच्या दुतर्फा माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. चाकाळे येथे युवासैनिक व शिवसैनिक यांच्या हस्ते जामगे-शिवतर रस्त्यावर आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करून साजरा करण्याचा संकल्प आमदार कदम यांनी केला होता. मतदार संघातील मंडणगड, खेड व दापोली या तिन्ही तालुक्यांत विविध शासकीय कार्यालयांचा परिसर, प्रमुख जिल्हा मार्ग तसेच शाळा व महाविद्यालयांच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातील भिलारे, आयनी व साखरोळी आदी गावांमध्येही आमदार कदम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून सक्रिय सहभाग घेतला.
------------------------------------------
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्गावर कळंबणी येथे आमदार याेगेश कदम यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.