चिपळूण : सांबराची शिंगे विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (३ डिसेंबर) रात्री उशिरा ताब्यात घेतले. ही कारवाई मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम (ता. चिपळूण) येथील सवतसडा धबधबा येथे करण्यात आली. ताब्यात घेतलेले दोघे परजिल्ह्यातील असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.परजिल्ह्यातील दोघेजण चिपळूणच्या दिशेने संरक्षित प्राण्याचे अवयव विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरालगतच्या परशुराम येथील सवतसडा धबधबा येथे पोलिसांनी सापळा रचला होता. त्याप्रमाणे काही वाहनांची कसून तपासणी केल्यानंतर एका परजिल्ह्यातील संशयित वाहनामध्ये २ वन्यजीवी सांबरांची भरीव शिंगे मिळाली. या कारवाईमध्ये दोघांवर वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४८ व ५१ प्रमाणे चिपळूण येथे गुन्हा नोंद केला आहे. दोन सांबराच्या शिंगांसह गाडी व अन्य मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा, या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलिस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, पाेलिस नाईक दत्तात्रय कांबळे, चिपळूण पाेलिस स्थानकाचे उपनिरीक्षक पाटील, चिपळूणचे वनरक्षक कृष्णा इरमाले सहभागी झाले होते.
सांबराची शिंगे विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांना अटक, मुद्देमाल हस्तगत; रत्नागिरी पोलिसांनी केली कारवाई
By संदीप बांद्रे | Published: December 05, 2022 3:39 PM