चिपळुणात ड्रग्ज विक्री प्रकरणी दोघेजण ताब्यात; अजूनही काहीजण टप्प्यात
By संदीप बांद्रे | Published: October 29, 2023 07:51 PM2023-10-29T19:51:42+5:302023-10-29T19:51:45+5:30
सजग नागरिकांनी थेट पोलिसांना बोलावून त्या तरुणांना ताब्यात दिले.
चिपळूण : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी रविवारी दुपारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडूनही प्रत्येकी १०० ग्रॅमची पुडी जप्त केली असून त्यांची तात्काळ कसून चौकशी सुरु केली आहे. अजूनही काहीजण पोलिसांच्या रडारवर असून ही मोहीम सातत्याने सुरु ठेवली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांचे धाबेच दणाणले आहेत.
विजय शांताराम राणे (५६, रा. मुरादपूर भोईवाडी) ओंकार सुभाष कराडकर (२६, टेरव कुंभारवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. यातील विजय राणे हा घराच्या शेजारीच, तर ओंकार कराडकर हा शहरातील खेंड बावशेवाडी येथील आमराईत गांजा विक्री करताना करताना आढळला. काही दिवसांपूर्वी शहरातील विरेश्वर कॉलनी परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पाचजण तरुण टोळके गांजाचे झुरके घेताना नागरिकांच्या निदर्शनास आले.
सजग नागरिकांनी थेट पोलिसांना बोलावून त्या तरुणांना ताब्यात दिले. पोलिसांनी देखील तात्काळ कारवाई करत त्यातील ४ तरुणांवर गुन्हे दाखल केले. विशेष म्हणजे त्या तरुणांमध्ये एक जण अल्पवयीन देखील होता. त्यांच्या जबाबानुसार बॉडिबिल्डर अमर चंद्रकांत लटके याला अटक केली. त्याला एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र त्याची शनिवारी जमिनीवर सुटका केली.
आता पोलीस यंत्रणेने या प्रकरणी मोठी मोहीम हाती घेतली असून रविवारी संपूर्ण शहर व परिसर पिंजून काढले. यामध्ये दोघेजण गांजा विक्री करताना आढळून आले. तत्काळ त्यांना ताब्यात घेत व त्यांच्याकडील गांजा जप्त करत पुढील कारवाई सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप मानके, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाडवी, प्रमोद कदम यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उप निरीक्षक पूजा चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
ड्रग्ज विक्रेत्यामध्ये भीती
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ड्रग्ज विक्रेत्यांचे मोबाईल जप्त केल्यानंतर त्यांनी काहींना लोकमत वृत्तपत्रातील बातम्या सोशल मीडियावर पाठवून सतर्क रहा, पोलीस कारवाई करत आहेत. असे मॅसेज केलेले आढळून आले आहेत. त्यामुळे पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत.