रत्नागिरी - रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आल्याची घोषणा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकातून करण्यात आली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उदय सामंत यांनी गावोगावी पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा दबदबा निर्माण केला आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या कार्याचा चमत्कार दाखवून दिला आहे. त्यामुळेच शिवसेनेत त्यांची ‘पत’ आणखीन वाढली आहे. रत्नागिरीचे आमदार म्हणून काम करत असताना उदय सामंत यांच्यावर पुणे विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी पुणे येथील विविध समस्या हाताळण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर पक्षवाढीसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.
ही जबाबदारी पार पाडत असतानाच शिवसेना उपनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. उपनेतेपदी निवड झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांन सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकलेली संघटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर २०१९ मध्ये शिवसेना स्वबळावर सत्तेवर येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नाणार प्रकल्प हद्दपार करणारच
राजापूर तालुक्यातील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होऊ घातलेला आहे. हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर पक्ष याबाबत रणनीती ठरवेल आणि त्यानुसारच आपण काम करू, असे उदय सामंत म्हणाले.