खेड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज खेड शहरातील एस. टी. मैदानात जाहीर सभा सुरु आहे. गोळीबार मैदानात सुरू असलेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपासह निवडणुक आयोगावर बोचरी टीका केली. देव माणसांचं दर्शन घ्यायला आलोय, असं म्हणत ठाकरे यांनी भाषणाला सुरूवात केली. आज माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, तरीदेखील तुम्ही इथे जमलात यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केले - ठाकरे तुमची मला साथ आणि आशीर्वाद हवेत अशी भावनिक साद ठाकरेंनी घातली. जे गद्दार आहेत, ते शिवसेना हे नाव चोरू शकतील पण शिवसेना चोरू शकत नाहीत. कारण त्यांना धनुष्यबाण पेलणार नाही अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले. निवडणुक आयोगाला मोतिबिंदू झाला नसेल तर शिवसेना काय आहे ते पाहायला या. निवडणुक आयोग गुलाम आहे, ते त्या लायकीचे नाहीत. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलेय त्यांच्या वडिलांनी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निवडणुक आयोगाचा समाचार घेतला.
"मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घातला जातोय" दरम्यान, तुम्ही शिवसेना नाही तर मराठी माणसांच्या आणि हिंदूच्या एकजुटीवर घाव घालत आहात. भारतीय जनता पक्षाला गल्लीतलं कुत्रं विचारत होत का? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला. निवडणुक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, ते चिन्हं, नाव देऊ शकत असेल पण शिवसेना आमची आई आहे, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"