कोरोनाच्या नावाखाली...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:40 AM2021-04-30T04:40:02+5:302021-04-30T04:40:02+5:30
सर्वच डॉक्टर अशा पद्धतीने लूट करतात, असे मुळीच नाही. मात्र, जे लोक करीत आहेत, त्याने अवघे वैद्यकीय क्षेत्र बदनाम ...
सर्वच डॉक्टर अशा पद्धतीने लूट करतात, असे मुळीच नाही. मात्र, जे लोक करीत आहेत, त्याने अवघे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत आहे. खासगी रुग्णालयांकडून जास्तीच्या बिलाची आकारणी, रुग्णांसाठी बेड न मिळणे अशा तक्रारी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांकडे वाढू लागल्या आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी हैराण झाले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात वेळेवर उपचार मिळणे, हेच मोठे आव्हान आहे. मात्र, तेच होताना दिसत नाही. घरी कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर प्रत्येकाचा गोंधळ निर्माण होत आहे. त्यावेळी बेड रिकामे असलेल्या रुग्णालयाची शोधाशोध करताना अनेकांची तारांबळ उडू लागली आहे. शासनाच्या ऑनलाइन वेबसाइटवर चौकशी करावी, तर तेथे माहिती अपडेट नाही. वेबसाइटवरील मोबाइलवर संपर्क करावा, तर त्यांच्याकडून योग्य माहिती मिळत नाही. लसीकरणाच्या बाबतीतही तोच 'ऑनलाइन' गोंधळ आहे. यातून गोरगरीब लोकांच्या हाती काहीच लागत नाही. त्यासाठी नगर परिषदेने व पंचायत समितीने मदत केंद्रे सुरू करण्याची गरज आहे. ज्यांना ऑनलाइन व्यवहार कळत नाही, त्यांच्या मदतीसाठी त्या-त्या प्रभागांत किंवा गावात स्वयंसेवक उपलब्ध करणे गरजेचे आहे. तरच, हा गुंता सुटू शकतो व वेळेत उपचार होऊ शकतात. यामध्ये सुधारणा व सुसूत्रता आणण्यासाठी प्रत्येकानेच पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा, ‘कोरोनाच्या नावानं चांगभलं’ असेच म्हणावे लागेल.