आरोग्याची काळजी घेत अखंडित वीजपुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:51 AM2021-05-05T04:51:52+5:302021-05-05T04:51:52+5:30
रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यातच उन्हाची ...
रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात संचारबंदी व वर्क फ्रॉम होम सुरू झाले आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असून, काही भागात अवकाळी पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज राहावे, अशी सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने कोविड व इतर सर्व रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती व रिफिलिंग उद्योगांसह सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. सध्या संचारबंदी व कार्यालयीन उपस्थितीच्या निर्बंधामुळे खासगी व शासकीय कर्मचाऱ्यांचे वर्क फॉर्म होम सुरू आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विजेची मागणीही वाढत आहे. राज्यात वाढत्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम आहे. मात्र अवकाळी पाऊस ठिकठिकाणी पडत आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युध्दपातळीवर सज्ज राहावे, अशी सूचना विजय सिंघल यांनी केली आहे. वादळी पाऊस किंवा अन्य कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्यास युध्दपातळीवरील दुरूस्ती कामांद्वारे किंवा पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याची कार्यवाही करावी. सोबतच वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीची कामे वेगाने करावीत, अशा सूचना केल्या आहेत.
सध्याची कोरोना लाट महावितरणकरिता कसोटीची आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सेवा देताना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. कोविडबाधित कर्मचारी व कुटुंबियांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडलस्तरावरील समन्वय कक्षांतर्फे कामे सुरू आहेत. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली आहे.