विद्यापीठाला पुस्तक संच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:18+5:302021-06-05T04:23:18+5:30
पेरण्या सुरु रत्नागिरी : तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने जमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणीला प्रारंभ केला आहे. ...
पेरण्या सुरु
रत्नागिरी : तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावत असल्याने जमिनी बुजल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातपेरणीला प्रारंभ केला आहे. पेरणीसाठी हलक्या पावसाची आवश्यकता असते. अपेक्षित पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांना भातपेरणी करणे सोईस्कर झाले आहे. धूळवाफेच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
पेन्शन योजनेची मागणी
खेड : राज्यातील विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक १ नोव्हेंबर २००५पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट केले होते. मात्र, या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी ‘शिक्षक भारती’कडून होत आहे.
लसीकरणाची मागणी
खेड : नोकरीनिमित्त व शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी खेड काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक तौसिफ खोत, आरिफ मुल्लाजी उपस्थित होते.
चौगुले यांची निवड
चिपळूण : तालुक्यातील अडरे येथील पी. के. सावंत माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बळवंत चौगुले यांची मुख्याध्यापकपदी निवड झाली आहे. १९८८पासून चौगुले हे अडरे विद्यालयात शिक्षकपदी कार्यरत आहेत. रत्नागिरी माध्यमिक पतपेढीच्या उपाध्यक्ष व संचालकपदीही त्यांनी काही वर्षे सेवा बजावली आहे.
मास्कचे वाटप
दापोली : राज्य परिवहन महामंडळाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त दापोली आगारातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी आगार व्यवस्थापक रेश्मा मधाळे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे उपस्थित होते.
शैक्षणिक भार स्वीकारणार
खेड : कोरोनामुळे आई-वडील गमावल्याने पोरकी झालेल्या मुलांच्या संगोपनासह शैक्षणिक भार उचलण्याचा निर्णय खेड जेसीजने घेतला आहे. या पाल्यांचा सर्व शैक्षणिक खर्च जेसीजच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अध्यक्ष पराग पाटणे यांनी सामाजिक जाणिवेतून हा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले.