प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणार लसीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:47+5:302021-03-24T04:29:47+5:30

रत्नागिरी : तालुक्यात सध्या ९ लसीकरण केंद्रे कार्यरत असून, लवकरच सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात ...

Vaccination centers will be set up in every primary health center | प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणार लसीकरण केंद्र

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणार लसीकरण केंद्र

Next

रत्नागिरी : तालुक्यात सध्या ९ लसीकरण केंद्रे कार्यरत असून, लवकरच सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. लसीकरणासाठी ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, रत्नागिरी तालुक्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास यश येत आहे. तालुक्यात आतापर्यंत १० हजारांहून अधिका लोकांना लस करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून दिवस-रात्र मेहनत घेतली जात आहे. कोरोना महामारीने कहर केलेला असताना, रत्नागिरी तालुका आरोग्य विभाग सक्षमपणे लढा देत होता. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना, तालुका आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करून कोरोनाग्रस्तांवर उपचार करून तो आटोक्यात आणला होता.

रत्नागिरी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे ८, ग्रामीण रुग्णालय १, जिल्हा रुग्णालय १ आणि नगरपरिषदेची आरोग्य केंद्रे २ आहेत. सध्या तालुक्यात ९ रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे आहेत. त्यामध्ये रामनाथ हॉस्पिटल, परकार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांचा समावेश आहे, तसेच जिल्हा रुग्णालय, पाली ग्रामीण रुग्णालय, नगरपरिषदेचे कोकणनगर, झाडगाव आरोग्य केंद्रे, वाटद, जाकादेवी, पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू आहेत. तालुक्यात कोतवडे, चांदेराई, मालगुंड येथेही लवकरच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

आतापर्यंत तालुक्यात १०,३७८ जणांना कोविड लस देण्यात आली असून, दररोज सुमारे १०० जणांना लस देण्यात येते. त्याचबरोबर, खासगी लसीकरण केंद्रांनाही लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यामध्ये आतापर्यंत एकूण २,९७८ कोरोना रुग्ण सापडले असून, ॲक्टिव्ह रुग्ण ७१ आहेत, तर वर्षभरात तालुक्यात ९५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

......................

कोट

रत्नागिरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी आहे, तसेच तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केंद्र आहे, तेथे ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- डॉ.महेंद्र गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी

रत्नागिरी

Web Title: Vaccination centers will be set up in every primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.