मेहरून नाकाडेरत्नागिरी : पावसामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असल्याने बाजारात उपलब्ध भाज्यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. फ्लॉवर, हिरवी मिरची, सिमला मिरची, गाजराच्या दराने शंभरी गाठली आहे. फरसबी, पावटा, आल्याने तर शंभरी ओलांडली आहे. डाळीही महागल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.जिल्ह्यात विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या कोल्हापूर, सांगली, सातारा येथून येत असून, डाळी कोल्हापूर, वाशी (नवी मुंबई) येथून विक्रीसाठी येतात. घाऊक बाजारपेठेतच भाज्यांच्या किमती वाढलेल्या असल्याने स्थानिक बाजारपेठेत चढ्या दरानेच भाज्यांची विक्री सुरू आहे. आॅगस्टपासून भाज्यांच्या दरात उतार कमी चढच अधिक आहेत.सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे दर ८० रुपयांवर पोहोचला होता. कोथिंबीर जुडीची ३० ते ४० रूपये दराने विक्री सुरू आहे. मूगडाळ १५० ते १६०, मसूर डाळ १००, हिरवे वाटाणे २००, छोले १२० रुपये, चणाडाळ १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. भाज्या, डाळी, कडधान्ये महागल्याने खिशाला कात्री बसली आहे. कांदा ५० ते ६०, बटाटा ४० ते ५० व लूसण १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.
कांदा, बटाटा, लसूण, डाळी, भाज्यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने कमवायचे काय आणि खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने भाज्या, डाळींच्या वाढत्या दरावर निर्बंध आणावेत.- वीणा पाटील, गृहिणी
जिल्ह्यात विक्रीसाठी येणारा किराणा कोल्हापूर, नवी (मुंबई) येथून येतो. घाऊक बाजारपेठेत दर वाढल्याने किरकोळ विक्रीचे दरही वाढले आहेत. जाग्यावरच दर अधिक असल्याने पर्यायाने वाढीव दराने विक्री करावी लागते.-जयसिंग जाधव, व्यापारी
पावसाळ्यात भाजीपाला उत्पादन घेण्यात येत असले तरी प्रमाण मर्यादित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विक्रीसाठी बहुतांश येणारा भाजीपाला कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यातूनच येतो. त्यामुळे घाऊक बाजारपेठेतील किमतीवर दर ठरतात.-प्रकाश शिंदे,विक्रेता
पावसामुळे उत्पादन घटलेअतिवृष्टीमुळे कांदा, बटाटा तसेच भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून, पीक खराब झाल्याने दरात वाढ झाली आहे. दाणा बाजारमध्ये कडधान्याच्या किमती प्रचंड वाढल्याने विक्रीदेखील जास्त किमतीनेच केली जात आहे.