गावठी दारु जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:24 AM2021-05-28T04:24:02+5:302021-05-28T04:24:02+5:30
दापोली : तालुक्यातील केळशी वरचा डुंग भागात पोलिसांनी छापा टाकून एक हजार ५० रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू ...
दापोली : तालुक्यातील केळशी वरचा डुंग भागात पोलिसांनी छापा टाकून एक हजार ५० रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, संशयित आरोपी राजेंद्र धोपावकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उघड्या डिपीकडे दुर्लक्ष
सावर्डे : चिपळूण शहरातील विरेश्वर तलावालगत आणि अंतर्गत रस्त्यावर उभ्या असलेल्या विद्युत खांबावरील डीपी कित्येक दिवसांपासून उघडाच आहे. या मार्गावर वाहनांसोबतच नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. या उघड्या डीपीमुळे विद्युतभारित यंत्रणेला स्पर्श होऊन अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
क्षमता विकास कार्यक्रम
चिपळूण : येथील ज्ञानप्रबोधिनी संपर्क केंद्र यांच्यामार्फत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी क्षमता विकास कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात तरुणांना स्वत:च्या क्षमता ओळखणे आणि त्या कशा वाढवाव्यात, या विषयावर मार्गदर्शन पुण्यातील तज्ज्ञ करणार आहेत.
रिक्षाचालकांचा अर्ज
रत्नागिरी : राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी या योजनेसाठी अर्ज भरले आहेत. अधिकृत रिक्षाचालकांच्या खात्यावर दीड हजार रुपये जमा होणार आहेत.
गाळउपसा रखडला
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री आणि सोनवी नदीतील गाळ उपसा यावर्षी पुन्हा रखडला आहे. हा गाळ उपसा यावर्षी न झाल्यास उपसलेला गाळ पुन्हा नदीपात्रात जाऊन डोकेदुखी ठरणार आहे. पावसाळा आता काही दिवसांवरच आला आहे, मात्र अजूनही गाळ उपशाबाबत कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
फेसशिल्डचे वाटप
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील कर्मचारी यांना फेसशिल्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याकरिता ग्रामनिधीतून खर्च करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य आणि कोतवाल हे सातत्याने कोरोनाच्या अनुषंगाने वाड्यांवर जाऊन फिरती करत असल्याने हा धोका लक्षात घेऊन हे वाटप करण्यात आले.
लसीकरणाला प्रतिसाद
लांजा : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंंद्र, शिपोशीअंतर्गत येणाऱ्या तळवडे उपकेंद्राच्यावतीने कोरोनाप्रतिबंधक लसीकरण आयोजित करण्यात आले होते. पेडणेकर माध्यमिक विद्यालय, तळवडे येथे हे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या लसीकरणाचा उपकेंद्र, तळवडेअंतर्गत येणाऱ्या गावातील १०० नागरिकांनी लाभ घेतला.
ऑनलाईन सुविधा
रत्नागिरी : फेरफार, सात-बारा उतारा तसेच खाते उताºयापाठोपाठ आता घरबसल्या वारस म्हणून आणि तक्रार अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यासाठी महसूल विभागाकडून आॅनलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वारस नोंद, तक्रार अर्ज, कर्जबोजा दाखल करणे आदी नोंदी आॅनलाईन करता येणार आहेत.
नुकसानग्रस्तांना मदत
देवरुख : गेल्या आठवड्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यातील हरपुडे गावात मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या गावातील दत्ताराम साळवी, बुधाजी भुघ, पांडुरंग भुघ आणि दत्ताराम गुरव यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आमदार शेखर निकम यांनी या चार नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ५५ सिमेंट पत्र्यांची मदत केली.
सन्मान निधी नोंदणी बंद
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी नवीन ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र ही नोंदणी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.