एमआयडीसी अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ उपोषण करणार : हुसेन ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:35 AM2021-09-05T04:35:03+5:302021-09-05T04:35:03+5:30
आवाशी : कोविडची कारणे देत वारंवार बैठक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांविरोधात अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील ग्रामस्थ लवकरच उपोषण ...
आवाशी : कोविडची कारणे देत वारंवार बैठक घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांविरोधात अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील ग्रामस्थ लवकरच उपोषण करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त विकास समितीचे अध्यक्ष हुसेन ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अतिरिक्त औद्योगिक वसाहत, लोटे-परशुराम (ता. खेड) यात समाविष्ट असलेल्या गावांमधील ६३० हेक्टर क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया १९८९ साली सुरु झाली. त्यानंतर ३२ वर्ष लोटली तरी हे काम अद्याप अपूर्णावस्थेत आहे. भू संपादनातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमआयडीसीच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह, वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्याबरोबर अनेकदा बैठका घेऊन निर्णय झाले आहेत. त्यांनी लेखी स्वरूपात आश्वासनेही दिली गेली आहेत. मात्र, त्यातील अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. दि. ३० डिसेंबर २०२० व २४ फेब्रुवारी २०२१ रोजी मंत्र्यांच्या दालनात वरिष्ठ अधिकारी, प्रकल्पबाधित ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत प्रलंबित प्रश्न १५ दिवसात मार्गी लावण्याचे ठरले गेले. मात्र, अद्याप एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही.
याबाबत रत्नागिरीतील एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी यांना काही दिवसांपूर्वी संपर्क साधला असता ते फोनवर काहीच प्रतिसाद देत नाहीत. मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोविडचे कारण देत मोबाईलवर मेसेज केला. तुम्ही येणार असाल तर एक ते दोनजण या, असे कळवले, असल्याचे ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र, एरव्ही अनेक प्रकारच्या बैठकींना अनेकजण गर्दी करतात ते चालतात, मग अनेक प्रकल्पबाधितांच्या निर्णयाला दोनच का? प्रकल्प बाधितांचे प्रश्न सोडविण्यात या अधिकाऱ्यांना रस नसल्यानेच ते कोविडचे कारणे देत टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे प्रकल्पबाधितांचा संयम सुटला असून, लवकरच प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर प्रकल्पबाधित उपोषण करणार असल्याची माहिती हुसेन ठाकूर यांनी दिली आहे.