पाण्यासाठी निवळी ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:21 PM2021-02-23T12:21:25+5:302021-02-23T12:23:02+5:30
water shortage ratnagirinews-वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे.
रत्नागिरी : वारंवार मागणी करूनही निवळीवासीयांना बावनदीचे पाणी देण्यात येत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर पाण्यासाठी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी बावनदी येथे उपोषण सुरू केले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील पाणी जयगड येथील जिंदल कंपनीचा कोळसा विझविण्यासाठी पुरविले जाते. हे पाणी येथील निवळीवासीयांना देण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी २०१८ सालापासून एमआयडीसीकडे पत्रव्यवहार केला होता, तरीही ग्रामस्थांना पाणी देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे.
निवळी हे गाव टंचाइग्रस्त असून, येथील ४,५०० लोकांना पाणी मिळावे, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती. या मागणीकडे दुर्लक्ष करून कंपनीला पाणीपुरवठा सुरूच होता. अखेर जेथून पाणी सोडण्यात येते, त्याच बावनदीच्या ठिकाणी रवळनाथ गाव विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली.
या उपोषणामध्ये संजय निवळकर, विनय मुकादम, सुनील गावडे, विवेक मुळ्ये, सचिन सावंत, सौरभ निवळकर यांचा सहभाग होता. ग्रामस्थ उपोषणाला बसल्याची माहिती मिळताच, एमआयडीसीचे अधिकारी सचिन राकसे आणि बी.एन. पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिंदल कंपनीला सोडण्यात येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले.