रत्नागिरी : शहरात कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटिल हाेत चालली आहे. रस्त्यावर जागाेजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत असतानाच आता ‘सनसेट पाॅइंट’ असणाऱ्या ठिकाणीही कचरा टाकून त्याचे विद्रूपीकरण करण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील समुद्रकिनारी कचरा फेकण्यात आल्याचे फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी किनाऱ्यावरून सूर्याचे दर्शन घ्यायचे की, कचऱ्याचे ढीग पाहायचे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.रत्नागिरी शहरातील मिऱ्या येथील भारती शिपयार्ड कंपनी आता बंद पडली आहे. या कंपनीच्या जागी नवीन शिपिंग कंपनी सुरू हाेत आहे. या कंपनीने भारती शिपयार्ड कंपनीतील सगळा भंगार माल गाेळा करण्यास सुरुवात केली आहे. हे भंगार एकत्र करून ते चक्क समुद्राच्या किनारी टाकण्यात आले आहे. ज्या ठिकाणी हा कचरा टाकण्यात आला आहे, त्या ठिकाणाहून अथांग समुद्राचे दर्शन हाेते. त्याचबराेबर सूर्याेदयाला सूर्याचे मनमाेहक रूप पाहता येते. हा भाग जणू ‘सनसेट पाॅइंट’च म्हणावा लागेल.
या ठिकाणी उभे राहून समुद्रासह सूर्याचे रूप सहज न्याहाळता येते. मात्र, याचठिकाणी भंगार माल माेठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. यामध्ये जुनी कागदपत्रे, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे यासह अन्य साहित्यही आहे. त्यामुळे हा भाग कचऱ्याने व्यापून गेला आहे. हा कचरा काही दिवसांनी समुद्रातही जाण्याची भीती आहे.शहरातील काही सायकलस्वार या भागात सकाळी सायकलिंगसाठी गेले असता त्यांच्या ही बाब निदर्शनाला आली. त्यांनी हा सारा प्रकार कॅमेराबद्ध केला आणि साेशल मीडियावर याचे फाेटाे व्हायरल झाले. या प्रकारामुळे अनेकांनी संतप्त भावना व्यक्त करत रत्नागिरीसारख्या पर्यटनस्थळाला कचऱ्यामुळे ग्रहण लागल्याची टीकाही केली आहे.