अतिवृष्टीचा इशारा; सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:38 AM2021-09-07T04:38:53+5:302021-09-07T04:38:53+5:30

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. ...

Warning of heavy rain; Collector's appeal for vigilance | अतिवृष्टीचा इशारा; सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

अतिवृष्टीचा इशारा; सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Next

रत्नागिरी : भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे

याविषयी खबरदारी बाळगण्यासंदर्भात प्रसिद्धिपत्रक जारी करण्यात आले आहे. हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ६ ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याअनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे खबरदारी घेण्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार दि.१० सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू असल्याने ६ सप्टेंबरपासून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी. पुलावरून, संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये. अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या ३-३ रांगा करू नयेत. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी.

आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित राहावे. आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तत्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. घर मोडकळीस आलेले असेल किंवा कच्च्या स्वरूपाचे असेल, तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षितस्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरित व्हावे. घराच्या अवतीभोवती पाऊस व वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे आदी पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूपासून लांब राहावे. आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे. दैनंदिन लागणारी औषधे, केरोसिनवर चालणारे बंदिस्त दिवे बॅटरी, गॅसबत्ती, काडीपेटी या वस्तू जवळ ठेवाव्यात. मोबाईल फोन बॅटरी चार्ज करून ठेवावेत. अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदीकिनारी राहणाऱ्या सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी व अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी. मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये. मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२ व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी ०२३५२-२२६२४८ / २२२२३३ या क्रमांकावर, तसेच तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Web Title: Warning of heavy rain; Collector's appeal for vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.