लांजा : लांजा एस. टी. आगारातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक १४ ऑगस्टपर्यंत न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आगारातील कर्मचाऱ्यांसमवेत साखळी उपोषण छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन एसटीचे रत्नागिरी विभागीय नियंत्रक तसेच लांजा आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत झोरे, सचिव राजेंद्र पाटोळे, खजिनदार अनिल दुड्ये यांनी म्हटले आहे की, आगारातील कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत वारंवार लेखी निवेदने तसेच पत्रे देण्यात आली आहेत. मात्र, तरीही आजतागायत या प्रश्नांची सोडवणूक आपणाकडून झालेली नाही. तसेच २६ जुलैच्या पत्राच्या अनुषंगाने अद्यापही त्याची सोडवणूक न झाल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बरेच प्रश्न हे आगार पातळीवर सुटणारे असल्याने निव्वळ आपल्या मनमानी कारभारामुळे परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून नियोजनशून्य अंमलबजावणी केल्यामुळे या समस्या तशाच राहिल्याचा आराेप करण्यात आला आहे. या सर्व प्रकाराला आगार व्यवस्थापक जबाबदार असल्याचे या निवेदनात म्हटले असून, दिनांक १४ ऑगस्टपर्यंत सोडवणूक न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी आगारातील कर्मचाऱ्यांसमवेत साखळी उपोषण करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे.