जल सप्ताहात राबविणार पाणी वाचविण्याचे उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:29 AM2021-03-24T04:29:36+5:302021-03-24T04:29:36+5:30
........................................... लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पाण्याची गळती थांबवणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे, नादुरुस्त स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी पूरक उपक्रम ...
...........................................
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पाण्याची गळती थांबवणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे, नादुरुस्त स्रोतांचे पुनरुज्जीवन करणे यांसाठी पूरक उपक्रम जल सप्ताहामध्ये राबवावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेकडून पंचायत समित्यांना करण्यात आली आहे. २२ पासून सुरू झालेला जल सप्ताह २७ मार्चपर्यंत चालणार आहे.
पाणी हेच जीवनमात्राच्या उत्पत्तीचे व संवर्धनासाठीचे प्रमुख कारण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सन १९९३ पासून दरवर्षी २२ मार्च हा ‘जागतिक जलदिन’ साजरा करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने जलशपथ घेऊन जिल्हा परिषदेकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पाणीपुरवठ्यासाठी वापरात येणाऱ्या जलस्रोतांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच पाणीगळती थांबविणे गरजेचे आहे. याकरिता पूरक ठरणारे विविध उपक्रम २७ मार्चपर्यंत राबविण्याचे नियोजन करण्याबाबत सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आली आहे. या वर्षीच्या जागतिक जलदिनाचे ब्रीदवाक्य ‘पाण्याचे मूल्य’ हे आहे. याचाच एक भाग म्हणून दापोलीतील जालगाव येथील निवेदिता प्रतिष्ठानच्या प्रशांत परांजपे यांनी 'पाणी वाचवा : जलसंवाद व घनकचरा सांडपाणी' याबाबत जिल्हा परिषदेत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घोणेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपाध्ये, वरिष्ठ भूवैज्ञानिक माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मरभळ, सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी, नरेगाचे साळुंखे व जिल्हा कक्षातील सर्व तज्ज्ञ / सल्लागार व कर्मचारी उपस्थित होते. जागतिक जलदिनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.