हाताच्या कुंचल्यातून साकारलेल्या रांगोळीने पाणावले डोळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 05:59 PM2020-11-30T17:59:43+5:302020-11-30T18:01:04+5:30
art, ratnagirinews ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : ए मॉं तू क्यो रोती है? देख आज मैं मरके भी जिंदा हूँ...असे शब्द कानावर पडले की, कोणाचेही हृदय हेलावून जाते. मात्र, शहिदांप्रति असणारे प्रेम व्यक्त करणारी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
रत्नागिरी येथील कुणबी भवन येथे वर्धापन दिनानिमित्त राहुल कळंबटे यांनी ही रांगोळी रेखाटली आहे. गेली ११ वर्ष राहुल कळंबटे विविध प्रकारच्या रांगोळ्या रेखाटत आहेत. त्यात ८ वर्ष संस्कार भारती तर ३ वर्ष पोट्रेट रांगोळ्या साकारत आहेत. ज्वलंत विषयावर रांगोळी रेखाटण्याचा त्यांना जणू छंदच लागला आहे.
कितीतरी कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील मौल्यवान जीव देशासाठी अर्पण केले आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की, कुटुंबातील तरणाताठा मुलगा शहीद झाल्यावर त्याचा भाऊ किंवा एखाद्या कुटुंबातील पती देशासाठी हुतात्मा झाल्यावर त्यांची पत्नी मोठ्या अभिमानाने सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहे.
तरुण मुलगा डोळ्यांसमोर अचानक शहीद झाल्याचे वृत्त धडकते तेव्हा कितीही झालं तरी पोटचा गोळा दुरावल्यावर त्याला जन्म देणाऱ्या त्याच्या मातेच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहतातच. पण तरीही शहीद झालेला तो पुत्र आपल्या मातेला धीर देताना काय म्हणत असेल, असा हृदयस्पर्शी प्रसंग रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी आपल्या रांगोळीच्या अदाकारीतून हुबेहूब रेखाटला आहे.
ही रांगोळी पाहताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. प्रशांत राजिवले आणि राजीव भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कळंबटे यांनी रांगोळी रेखाटण्याची कला अवगत केली आहे. शनिवारी राहुल कळंबटे यांनी रेखाटलेल्या या रांगोळीने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला.
चालू घडामोडींवर रांगोळी रेखाटायला अधिक आवडते. दोनच दिवसांपूर्वी सीमेवर लढणारे लढणारे जवान शहीद झाले. शहिदांप्रति असणारा आदर, त्यांच्याप्रति असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रांगोळी रेखाटली. ही रांगोळी रेखाटताना त्या मातेच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पाहून मनही दाटून येत होते. या रांगोळीच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली आहे.
- राहुल कळंबटे