चिपळूण : चिपळूणमध्ये लोककला महोत्सव होत आहे, या महोत्सवाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करीन, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसे आम्हीही कलाकार आहोत. सहा महिन्यांपूर्वी आम्हीही आमची कला दाखविली आहे. चांगलं काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला हवे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.जानेवारीमध्ये येथील लोकमान्य टिळक वाचनालय, अप्पा जाधव अपरांत संशोधन केंद्र व मराठी साहित्य परिषदेतर्फे लोककला महोत्सव होत आहे. या महोत्सवा निमित्ताने कार्यालयाच्या शुभारंभावेळी सामंत बोलत होते. यावेळी लोटिस्माच्या वस्तू संग्रहालयाच्या नव्याने उभारणीच्या कामाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक व लोटिस्माचे आधारस्तंभ प्रकाश देशपांडे यांनी केले.लोककला महोत्सवाचे स्वागताध्यक्ष स्वीकारण्याची विनंती केल्यानंतर सामंत यांनी ती जबाबदारी हसतमुखाने स्वीकारल्याचे ते म्हणाले. साहित्य संमेलनावेळी पंचवीस लाख रुपये शासनाकडून देण्याची घोषणा झाली होती. हा निधी अडकला होता. परंतु, पालकमंत्री झाल्यानंतर तातडीने हा निधी आणून दिला. लोटिस्माचे वस्तू संग्रहालय पुरात वाहून गेले. त्यावेळी मंत्री सामंत यांनी पन्नास लाखांचा निधी जाहीर केला, हा निधी बांधकाम विभागाकडे वर्गही झाल्याचे देशपांडे यांनी सांगितले.यावेळी मंत्री सामंत यांनी लोककला महोत्सवाला जिल्हा नियोजनमधून निधी देण्याची घोषणा केली. मंत्री सामंत यांचा लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्याता आला. यावेळी आमदार शेखर निकम, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू, माजी नगरसेवक परिमल भोसले, लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, महमंद झारे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कवी अरुण इंगवले, लोककला महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, ग्रंथपाल गौरी भोसले उपस्थित होते
आम्हीही कलाकार, सहा महिन्यांपूर्वी आमची कला दाखविली; मंत्री उदय सामंतांची मिश्किल टीपणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 3:32 PM