हवामानाची माहिती आता अधिक अचूक मिळणार, रत्नागिरी जिल्ह्यात ६५ ‘स्वयंचलित हवामान केंद्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 03:39 PM2017-12-20T15:39:23+5:302017-12-20T15:45:58+5:30
हवामानविषयक विविध घटकांची दैनंदिन अचूक माहिती गोळा करण्यासाठी मंडलस्तरावर ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : हवामानविषयक विविध घटकांची दैनंदिन अचूक माहिती गोळा करण्यासाठी मंडलस्तरावर ‘स्वयंचलित हवामान केंद्र’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचे शंभर टक्के काम पूर्ण झाले असून, स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०१२ साली प्रायोगिक तत्त्वावर जाहीर करण्यात आली. या योजनेंतर्गत सरासरीपेक्षा कमी अधिक पाऊस, पावसाचा खंड, सोसाट्याचा वारा, गारपीट, सापेक्ष आर्द्रता या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिले जाते. जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेत दरवर्षी सहभागी होतात.
हवामानातील बदल व घटकांची माहिती खासगी केंद्रांकडून घेण्यात येत होती. याआधीची चुकीच्या ठिकाणी हवामान केंद्र उभारल्यामुळे हवामानाची अचूक माहिती उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते.
दरवर्षी हजारो रूपये विम्याची रक्कम भरूनसुध्दा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनसुध्दा हवामान केंद्राच्या चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत असे. अखेर शेतकऱ्यांच्या मागणीमुळेच शासनाने प्रत्येक महसूल मंडलस्तरावर हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला शिवाय कामाची पूर्तता वेगाने करण्यात आली आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना हवामानाची अचूक माहिती मिळणार आहे. शिवाय नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना दोन दिवस आधीच शेतकऱ्यांना मिळेल. या केंद्रामुळे तापमान, पर्जन्यमान, हवेची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा या वातावरणातील आधारित पीक विमा योजनाविषयक सल्ला, संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबवण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.
१२ किलोमीटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर दहा मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. नोंदवलेली माहिती सर्व्हरला दर एका तासाने पाठविली जाणार आहे. त्यामुळे संकलित होणारी माहिती कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला प्राप्त होणार आहे.
सार्वजनिक खासगी भागिदारीतून ‘बांधा-मालक व्हा- चालवा’ या तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेची निवड केली आहे. संस्थेतर्फे ‘स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार असून, त्यानंतर पुढील सात वर्षे स्वखर्चाने हवामान केंद्र चालविण्यात येणार आहे. शिवाय शासनाला मोफत हवामानविषयक माहिती देण्याची सूचना करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आंबा, काजू पिकासाठी फळपीक विमा योजना राबवण्यात येत आहे. हवामानावर आधारित असलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे. हवामानातील बदलाचा परिणाम पिकावर होत असल्याने हवामानातील बदल याबाबतची अचूक माहिती मिळणार आहे. चुकीच्या माहितीमुळे शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून होणारी फसवणूक टळेल, शिवाय आर्थिक नुकसानदेखील होणार नाही.
शंभर टक्के काम : रत्नागिरी कोकणात प्रथम
जिल्ह्यात ६५ महसूल मंडले असून, ६१ मंडलांसाठी जागा सुरूवातीलाच निश्चित करण्यात आली होती. महसूल, कृषी विभाग, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेकडील जागा आहेत. मात्र, चार जागांचा प्रश्न उद्भवला होता. त्यामध्ये राजापूरमधील कोंड्येतर्फ सौंदळ, रत्नागिरीतील पावस मंडल, खेडमध्ये धामणंद, संगमेश्वरातील कोंडगाव येथील मंडलांचा जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली सोडविण्यात आल्याने जिल्ह्यात ६५ स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.