लांजा : आठ ते नऊ महिन्यानंतर लांजा तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी भरविण्यात आलेल्या आठवडा बाजाराला ग्राहकांचा व जिल्ह्याबाहेरील व्यापाऱ्यांचा थंड प्रतिसाद लाभल्याने बाजारात म्हणावी तशी गर्दी दिसून येत नव्हती.मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीचे देशावर मोठे संकट ओढवल्याने संपूर्ण देश लाकडाऊन करण्यात आला होता. तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लांजा तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजारही प्रशासन व व्यापारी यांनी येथील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद केला होता.
या आठवडा बाजारामध्ये तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्राहक आठवड्याचा बाजार खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. बाजाराला पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येऊन आपला माल विक्री करतात. यामुळे कोरोनाचा मोठा प्रसार होऊ शकतो, अशी भीती येथील प्रशासन व व्यापारीवर्गाला होती. त्यामुळे खबरदारी म्हणून बाजार बंद करणे येथील जनतेच्या हिताचेच होते.तालुक्याच्या ठिकाणी भरविण्यात येणार आठवडा बाजार कधी सुरु होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार सुरु होत असल्याचे प्रशासनाने सोमवारी जाहीर केल्याने पश्चिम महाराष्ट्रातील व्यापारी यांना व तालुक्यातील ग्राहकांना यांची माहिती मिळाली नसल्याने मोजकेच व्यापारी व मोजकेच ग्राहक दिसत होते.एक दिवस आधी जाहीर केल्यामुळे प्रतिसाद कमीसध्या दिवाळीचा सण व कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी घट पाहता आठवडा बाजार सुरु करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच सोमवारी प्रशासनाने मंगळवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडा बाजाराला परवानगी दिल्याने तब्बल नऊ महिन्याच्या कालावधीनंतर मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडा बाजार सुरु झाला आहे. मात्र एक दिवस आधी त्याबाबतची घोषणा केल्यामुळे त्याची माहिती व्यापारी तसेच ग्राहकांपर्यंत पोहोचली नसल्याने हा प्रतिसाद कमी असल्याचा अंदाज आहे.