अतिवृष्टीत विहीर कोसळली भर पावसाळ्यात पाण्यासाठी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:11+5:302021-09-16T04:39:11+5:30
खेड : तालुक्यातील घेरारसाळगड, चिराचा आंबा धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळली असून, भर पावसाळ्यात ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. ...
खेड : तालुक्यातील घेरारसाळगड, चिराचा आंबा धनगरवाडी येथील विहीर अतिवृष्टीत कोसळली असून, भर पावसाळ्यात ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीत खेड तालुक्यातील घेरारसाळगड गावातील चिराचाआंबा धनगरवाडी येथील सार्वजनिक विहीर कोसळून स्थानिक ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
ते म्हणाले की, चिराचा आंबा धनगरवाडी रसाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्व बाजूला दुर्गम भागात वसलेले आहे. सन १९९९मध्ये शासकीय निधीतून येथे विहिरीचे बांधकाम झाले होते. विहीर नादुरुस्त झाली होती. स्थानिक ग्रामस्थ वारंवार शासनदरबारी विहीर दुरुस्तीची मागणी करती होते; परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मोडकळीस आलेल्या विहिरीची दखल घेतली नव्हती. दुर्दैवाने अतिवृष्टीत विहीर पडली आहे. या विहिरीची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी शासनाकडे मागणी असल्याचे आखाडे यांनी सांगितले.